अहिराणीची अ‘स्मिता’!
🔻🔻🔻🔻🔻
बुद्धिवादी,
बंडखोर
नटी म्हणून एक स्री अभिनेत्री म्हणून स्मिता
पाटीलचे विचार आणि व्यक्तिमत्व महत्वाचे आहेत. अवघ्या
३१ वर्षांच्या आपल्या आयुष्यात ती जे अफाट जगली त्याभोवती कायमच एक विस्मयाचं वलय
बनून राहिलं. आपल्या तुटपुंज्या चित्रपट कारकीर्दीत केलेल्या भूमिका, त्यात दिसलेली तिची अभिनयाची ताकद. त्यातून उभी राहणारी तिची कमालीची कणखर,
ठाम आणि स्वतंत्र बाणा असलेल्या स्त्री-प्रतिमा. हीच कायम तिची ओळख
बनून राहिली आणि तिच्या अकाली जाण्यानंतरही तिच्या या प्रतिमेचं आकर्षण तिच्या
चाहत्यांच्या मनात कायम राहिलं. अहिराणी मुलखाची अस्मिता, खानदेशकन्या स्मिता
पाटीलच्या कारकिर्दीकडे मागे वळून पाहताना कमालीच्या यशस्वी
आणि अभिनयसंपन्न व्यक्तिमत्त्वाची एक वेगळीच प्रतिमा हाती लागते; जिचं
पडद्यावरच्या स्मिता पाटीलशी साम्य शोधणं कदाचित कठीण जावं...
बुद्धिवादी बंडखोर नटी म्हणून एक अभिनेत्री आणि एक स्त्री म्हणून स्मिता पाटीलचे विचार आणि व्यक्तिमत्व महत्वाचे आहेत. तिची कौटुंबिक जडणघडण, घरातच मिळालेलं समानतेच्या आणि पुरोगामी विचारांचं बाळकडू, सेवाभावी आणि अत्यंत शिस्तीच्या तिच्या ‘मा’ चा तिच्यावर असणारा प्रभाव; हे सर्व कवडसे खान्देशातील स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब स्व. शिवाजीराव पाटील आणि आई विद्याताई यांच्या सान्निध्यातून प्रकाशमान व्हायचे. अवघ्या ३१ वर्षांच्या आपल्या आयुष्यात (१७ ऑक्टोंबर १९५५ ते १३ डिसेंबर १९८६) ती जे अफाट जगली त्याभोवती कायमच एक विस्मयाचं वलय बनून राहिलं. याला प्रामुख्याने कारणीभूत ठरल्या त्या तिने आपल्या तुटपुंज्या चित्रपट कारकीर्दीत केलेल्या भूमिका, त्यात दिसलेली तिची अभिनयाची ताकद. त्यातून उभी राहणारी तिची कमालीची कणखर, ठाम आणि स्वतंत्र बाणा असलेल्या स्त्री-प्रतिमा. हीच कायम तिची ओळख बनून राहिली आणि तिच्या अकाली जाण्यानंतरही तिच्या या प्रतिमेचं आकर्षण तिच्या चाहत्यांच्या मनात कायम राहिलं. या पार्श्वभूमीवर नागपूरचे ज्येष्ठ गांधीवादी नेते गिरीश गांधी यांनी संपादित केलेला ‘स्मिता स्मृति विशेषांक १९८७-८८’वाचनात येतो तेंव्हा, राष्ट्र सेवा दलातील कलापथकाच्या मुशीत घडलेल्या, खान्देशकन्या स्मिता पाटील या कमालीच्या यशस्वी आणि अभिनयसंपन्न व्यक्तिमत्त्वाची एक वेगळीच प्रतिमा हाती लागते जिचं पडद्यावरच्या स्मिता पाटीलशी साम्य शोधणं कदाचित कठीण जावं.
मात्र स्मिता पाटील या
नावामागे दडलेली हळवी, मनस्वी, व्यवहार
न सांभाळू शकणारी स्मिता पुढे येते. स्मिताची लोकप्रियता, तिच्या
वादग्रस्त विवाहामुळे झालेली फरफट, मोठ्या दिग्दर्शकांकडून
महत्त्वाचे चित्रपट दुसऱ्याच अभिनेत्रीला दिले
गेल्याने आलेली अस्वस्थता, व्यावसायिक चित्रपटांत आलं तरंच आपली मार्केट
व्हॅल्यू वाढेल, असं वाटून चिकाटीने असे चित्रपट करण्याचा
तिचा हट्ट, सरतेशेवटी तिला लागलेली संसार थाटण्याची, मातृत्वाची ओढ आणि अर्ध्यावरच संपून गेलेला तिचा प्रवास हे तुकड्या-तुकड्यातून
आपल्या
समोर येतं. शबाना आझमीशी तिचं असलेलं लव्हहेट नातं, दीप्ती नवलशी
असलेली मैत्री, रेखाशी मैत्री करण्याची तिची वेडी पण अपूर्ण
राहिलेली इच्छा यांतून सामोरी येणारी स्मिता पाटील ही तिच्या पडद्यावरच्या
प्रतिमेशी फारकत घेताना दिसते. चारचौघींसारखं चाकोरीतलं आयुष्य जगण्याच्या धडपडीत
तिच्यातली मूळची धग कुठेतरी विझत चाललेली जाणवत राहते.
केवळ योगायोगाने भारतीय
चित्रसृष्टीच्या क्षितिजावर उगवलेली ही तारका पाहता पाहता आपल्या स्वयंतेजाने
धृवपद मिळवून बसली होती. ती आली, तिनं पाहिलं आणि आम चित्रपटसृष्टीला
अंकित करून टाकलं. पुण्याच्या भावे स्कूलमध्ये माध्यमिक विभागात शिकत असताना
शिक्षिकेने दिलेला ‘मोठेपणी कोण होणार?’ निबंध. त्यावर ‘आपण मोठेपणी चित्रपट अभिनेत्री होणार’
असा भविष्याचा वेध एखाद्या निष्णात भविष्यवेत्त्याप्रमाणे तिने
घेतला होता. अठराव्या वर्षी दूरदर्शनवर निवेदिका तर विसाव्या वर्षी रुपेरी
पडद्यावर पदार्पण. तर पुढच्या दहा वर्षात जवळजवळ ७५ सिनेमांची अनभिषिक्त महाराणी,
१९८४ मध्ये आंतरराष्ट्रीय नायिका बनली. फ्रान्समध्ये ला रॉशेला
शहरातील हाऊस ऑफ कल्चरमध्ये तिच्या चक्र, बाजार, मंथन, भूमिका ह्या चित्रपटांचा महोत्सव
(रिट्रॉस्पेक्टिव्ह) भरविण्यात आला. सत्यजित रायनंतर हा बहुमान स्मिताला मिळाला
होता. तत्पूर्वी तिला पद्मश्री हा सरकारी किताब आणि चक्रमधील अम्मा ह्या
भूमिकेबद्दल अभिनयासाठी ‘सुवर्णकमळ’ मिळाले
होते. अभिनयाबद्दल राज्य व राष्ट्रीय पुरस्कार दोन वेळा प्राप्त झाले होते. कसलीही पार्श्वभूमी नसताना वा गॉडफादर नसताना तिला हे मानसन्मान मिळत गेले. पण
शेवटपर्यंत तिचे पाय जमिनीवरच होते. एकदा तिचा धुळ्याला राष्ट्रीय पुरस्कार
मिळाल्याबद्दल सदानंद वर्देंसोबत सत्कार ठेवण्यात आला होता. सत्काराला उत्तर
देतांना सदानंद वर्दे नेहमीप्रमाणे सेवादलाच गाणं म्हणायला लागले. स्मिता
खुर्चीवरून उठून त्यांना साथ द्यायला लागली. मध्येच ते विसरून थांबले तेंव्हा
स्मिताने ते गाणं उचलून धरलं आणि पूर्ण केलं. १९७१ साली तिचं छोटंसं ऑपरेशन करावं
लागणार होतं. तिने ते टाळण्यासाठी विद्याताईंकडे खूप हट्ट केला. कारण कलापथकाचा
दौरा होता आणि ऑपरेशनमुळे तिला येता आलं नसतं. सेवादाच्या कार्यक्रमांना कोणी जाऊ
नकोस म्हटलेलं तिला खापायचं नाही. त्याबाबत ती कोणाचंच ऐकायची नाही. सेवादलावर
तिने धो धो प्रेम केलं. तिचं सगळंच उत्स्फूर्त, धबधब्यासारख
निर्मळ असायचं आपल्या पहिल्याच सन्मानादाखल मिळालेली रोख रक्कमदेखील तिने
पंढरपूरच्या बालकाश्रम, आनंदवन व सेवादल यांना दान करून
टाकली होती. स्त्री संघटनांना मदतीकरिता प्रिमिअर शो दिले. कारण सामाजिक जाण
तिच्या रोमारोमात होती.
सुरुवात तिची ‘तीव्र माध्यम’
या अनुबोध पटाने झाली. अरुण खोपकर यांनी फिल्म इन्स्टिट्युटकरिता तो
निर्मिला होता. त्या अनुबोधपटात स्मिताला पाहून शाम बेनेगल यांनी तिला आपल्या ‘चरणदास चोर’ या चित्रपटात भूमिका दिली. त्यानंतर
ग्रामीण स्त्रीच्या भूमिकात त्यांच्याच मंथन व निशांत यात ती चमकली. तिच्या
पदार्पणातच ‘स्त्री’-चे जीवन पडद्यावर
आले नव्हते, ते उभे करण्याची संधी वेगवेगळ्या ‘शेडस्’मधून तिला मिळाली. त्याकरिता शाम बेनेगल,
जब्बार पटेल, गोविंद निहलानी, केतन मेहतासारखे मातब्बर, प्रतिभावान दिग्दर्शक
लाभले. त्याला जोड विजय तेंडुलकर, चि. त्र्यं. खानोलकर,
जयवंत दळवी, श्री. दा. पानवलकर, सत्यदेव दुबेंसारखे प्रतिभा, परीस लाभलेले लेखक
लाभले. आदिवासी स्त्री, शोषित स्त्री, मध्यमवर्गीय
स्त्री अशा स्त्रीच्या सर्व प्रतिमा स्मिताने रंगविल्या. चक्रमधील अम्मा तिचं
कामाठी हिंदी बोलणं, वचवच बोलणं, तिचं
चालणं, तिचं थुंकणं, तिचा बुचडा बांधणं,
गोंदण, साडी नेसण्याची पद्धत अशी ही पुलाखाली
राहणारी बाई-स्मिता ती भूमिका मूर्तिमंत जगली आणि म्हणूनच
तिला ह्या भूमिकेबद्दल राष्ट्रीय पुरस्कार सुवर्णकमळ मिळाला. इतक्या लाजवाब
अभिनयाचं उदाहरण कदाचित क्वचितच असेल. गिधमध्ये देवदासी हलुभीची भूमिका अशीच चटका
लावून जाते. आक्रोशमधील आदिवासी स्त्री, भूमिकामधील उषा,
मंथनमधील देहाती गवळणबिंदू, देबशिशुमधील सीता,
अर्धसत्यमधील ज्योत्स्ना, सुबह/उंबरठामधील-सुलभा
महाजन, जैत रे जैतमधील ठाकरकन्या, चिंधीमधील
गणिका, बाजार, मंडी, चिदंबरम्मधील शोषित मल्याळी स्त्री अशा अनेकानेक स्त्री भूमिकांची चळत ती
उभी करू शकली.
वेगवेगळ्या भूमिकांतून
भारतीय अशिक्षित,
उपेक्षित, ग्रामीण स्त्रियांची चित्रे तिने
साकार केली. नुसतीच साकार केली नाहीत तर भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांना अक्षरत्व दिलं. स्त्रीचं मन वेदना, कुंठा, घुसमट,
आशा आकांक्षांना मूर्त स्वरूप दिलं. उंबरठातील तिची निवड सुरुवातीस
तेंडुलकरांना पाहिजे तशी रुचली नव्हती पण नंतर मात्र तिचीच निवड योग्य अशी कबुली
दिली. कुमार सहानी दिग्दर्शित तरंगमधील-कामगारांच्या बाजूने लढणारी मराठमोळी
स्त्री हाही एक वेगळा आविष्कार आपल्यापुढे उभा केला आहे. निशांतमध्ये ती नायिका
नव्हती तरी तिने लक्ष वेधून घेतले. भीगी पलके, मेरा दोस्त
मेरा दुश्मन, नमक हलाल, मेरा घर मेरे
बच्चे, आपके साथ, अर्थ, हादसा, दर्द का रिश्ता, भवनी
भवाई इ. इ. अनेक चित्रपटांतून आपली अमीट छाप तिने पाडली आहे. एवढेच नाही तर
आयएनटीच्या छिन्न नाटकालाही तिने बोलपटांच्या मापानेच न्याय दिला.
सावळा रंग, शेलाटी बांधा
पण यावर मात केली तिच्या संवेदनशील चेहऱ्याने. तिचे आत्मनिर्भर पाणीदार काजळलेले
टपोरे बोलके डोळे, नाकी डोळ्यातील नीटसता या साऱ्यांमुळे तिच्या क्लोजअपमधून सारा अभिनय बाहेर यायचा. अभिनयाबाबत तिची आपल्या चेहऱ्यावर सारी भिस्त, तीच अधिक बोलत असे. तिच्याजवळ मधुबालेचं सौंदर्य
अजिबात नव्हतं. नर्गिसचा अवखळपणाही नाही, मीनाकुमारीच्या
सोज्वळ चेहऱ्याशी मात्र काहीसं साम्य होतं.
रुढार्थाने नायिकेला आवश्यक असे आकर्षक काहीच नव्हते, लावण्य नव्हते.
अशा ह्या वेगळ्या रसायनामुळेच तिला इनग्रिड बर्गमन म्हटले गेले. असा कलावंत शतकात
एखादाच जन्माला येतो. तिनेच म्हटल्याप्रमाणे अभिनय कला तिला देवाने दिलेले देणे
होते. चेहर्या्वर कृत्रिमता अजिबात नसल्यामुळे क्लोजअपचं सामर्थ्य तिला
आत्मविश्वासपूर्वक वापरता आले. नैसर्गिक बुद्धी, भावना,
सामंजस्य यांचे बेमालूम मिश्रण तिच्या व्यक्तीकरणात होते. कुठल्याही
अभिनयाचा डिप्लोमा वा अभिनयाचे शिक्षण नसूनही, ग्रामीण
स्त्री व्यथा, अन्याय, घुसमट यात घुसत
असे त्यामुळे ती जिवंत, रसरशीत पात्रे उभी करू शकली. स्वतःची
स्वतंत्र अभिनय शैलीही तिने निर्माण केली नाही. कारण एकाच साचेबंद भूमिकेत ती
कधीही अडकून पडली नाही. प्रत्येक भूमिका वेगळी. त्यामुळे तिचा प्रत्येक परकाया
प्रवेश वेगळा होत होता. शक्ती, नमकहलाल यात अमिताभ व
दिलीपकुमारबरोबर ती समर्थपणे उभी राहिली. भूमिका जगायचे एक वेगळे अभिनय सामर्थ्य
तिच्यात होते.
एक्झिट घेतानादेखील असा
काही अनपेक्षित अभिनय करून गेली की सर्वांचे डोळे अश्रूंनी डबडबून आले. सुरुवातीचे
तिचे बरेच सिनेमे समांतर होते. शेवटी चित्रपट सृष्टीतील तडजोडीला काही वेळा शरण
जावे लागले,
मात्र समांतर चित्रपट ही तिची पहिली आवड होती. भूमिका स्वीकारताना
पैशांचा विचार तिने गौण मानला आणि कला व कामातून समाधान कसे मिळेल याचाच विचार
अधिक केला. ह्यातून तिला भरपूर समाधान मिळालेही. जीवनाची वाटचाल करताना काहींची
पावले नकळत बरोबर पडत जातात. योगायोगाचा मोठा भाग असूनही, त्याला
चिवट श्रमाची जोड देऊन स्मिता अत्युच्च शिखरावर आरुढ झाली होती. म्हणूनच आपल्या
समकालीन शबाना, रेखा ह्या जबरदस्त तारकांनाही तिने मागे
टाकले होते. कलाकार म्हणून ती मोठी होती पण माणूस म्हणून ती त्याहीपेक्षा मोठी
होती, म्हणूनच इंडस्ट्रीतल्या ऐषआरामाला-दिमाखाला अगदी सीमित
ठेवून राष्ट्रीय, सामाजिक बाबींना आपल्या संस्कारानुसार कधीच
डोळ्याआड होऊ दिले नाही. इब्सेनच्या नोराप्रमाणे उंबरठ्यातील सुलभा बाहेर पडली.
आपल्या खाजगी जीवनात ते पुरोगामित्व जगण्याचा-जपण्याचा तिने शेवटपर्यंत प्रयत्न
केला. त्याबाबतीत कुणाचीही भीड ठेवली नाही.
स्मिताच्या वाटचालीवर
संस्कार होते ते प्रामुख्याने आई-वडिलांचे व राष्ट्र सेवादलाचे. आई-वडिलांचे
कष्टातून उभे राहिलेले जीवन तिने पाहिले होते. वडील शिवाजीराव पाटील स्वातंत्र्यसैनिक तर आई विद्याताई एक समर्पित समाज सेविका. शिवाय खानदेशच्या चिवट मातीचा एक काही
खास गुण तोही तिच्यात दिसून येतो. सुधाताई
वर्दे, अनु वर्दे, एस.एम. जोशी, नानासाहेब
गोरे यांच्याबद्दल स्मिताच्या मनात अतीव आदर होता. सेवादल शिबीर, सेवादल कलापथक यांच्याकडून सर्जनशीलता, शिस्त,
संघभावना याची देन मिळाली. सेवादलाच्या कलापथकातून भारत दर्शन,
महाराष्ट्र दर्शनमधून तिने कामे केली, नृत्ये
केली. ही तिची फार जमेची आणि मोठी पार्श्वभूमी म्हणावी लागेल. चित्रपट
क्षेत्रातील पदार्पणालाच शाम बेनेगल, गोविंद निहलानी,
जब्बार पटेल, महेश भट, मृणाल
सेन अशा दिग्गजांचे मार्गदर्शन तिला मिळाले.
बोलता बोलता स्मिताला
जाऊन तब्बल तेहतीस वर्षे झाली. स्मिताच्या स्मृति
जतन करून ठेवणारे गिरीश गांधी म्हणतात. “त्या रविवारी सकाळी आरामात उठून
तिन्ही चारी दैनिक-साप्ताहिके चाळत बसलो होतो. तिन्ही वृत्तपत्रात स्मिताची
प्रकृती चिंताजनक,
अत्यवस्थ अशी ठळक बातमी होती. मनातल्या आतल्या कप्प्यात वाटलं,
स्मिता अत्यवस्थ असली तरी तिला उपचाराला काय कमी पडणार आहे? पण चौथ्या वृत्तपत्राकडे नजर वळविली आणि ‘स्मिता
पाटीलचे दुःखद निधन’ हे शब्द वाचून उडालोच. पोटात भीती-दुःख
मिश्र असा गोळा उठला. सबंध बातमी डोळे विस्फारून वाचली. तरीही कुठेतरी वाटत होते,
चुकीची बातमी असेल. काहीतरी वेगळे ऐकायला मिळेल. पण नाही, बातमी तर पक्की दिसत होती. बातमीबरोबर निरागस हास्य असणारी स्मिताची छबी
होती, ‘काय जाताना देखील कसा अनपेक्षित अभिनय केला?’ शनिवार दि. १३ डिसेंबर १९८६, मध्यरात्री
भारतभूला पडलेलं एक गोड स्वप्न विराम पावलं. विशाल खान्देशची अ‘स्मिता’ हरवली. पहाटेचं गोड स्वप्न पाहत असताना जाग
यावी व ते विरलेले जाणवल्यावर जी विषण्णता येते तीच अनुभवायला मिळाली.”
स्मिता पाटील वेळेआधी
आपल्यातून निघून गेली तरीही विस्मृतीत कधी गेलीच नाही. उलट तिच्या विचारांचा, भूमिकांचा,
अभिनयाचा आदर्श सतत मानला गेला हे तिच्या कामाचं मोठेपण. तिच्या
चाहत्यांची संख्या पिढ्या बदलल्या तरीही कमी झालेली नाही. स्मिताच्या शोकाचं गहिरं
सावट तेहतीस वर्षे उलटली तरीही महाराष्ट्र, देशावरून हटलेलं
नाही. तिचा मृत्यू केवळ एक धक्का नव्हता तर ती एक अविश्वसनीय शोकांतिका होती…
तिच्या उंबरठा चित्रपटातील गाण्यासारखी...
“सुन्या-सुन्या मैफिलीत
माझ्या, तुझेच मी गीत गात आहे,
अजूनही वाटते मला की अजूनही
चांदरात आहे.
कळे न पाहशी कुणाला ? कळे न हा चेहरा
कुणाचा ?
पुन्हा पुन्हा भास होत आहे, तुझे हसू
आरश्यात आहे !”
सुरेश भटांचे अर्थवाही
शब्द, सोबतीला लतादिदींचा काळीज चिरणारा स्वर. गाण्याचा शेवट होताना स्मिता
पाटीलचे पाण्याने भरलेले डोळे काही केल्या पिच्छा सोडत नाहीत !
रणजितसिंह
राजपूत
संदर्भ:
“स्मिता-स्मृति-१९८७-८८” (गिरीश गांधी),
“स्मिता पाटील” (रेखा देशपांडे),
"स्मिता, स्मितं आणि मी" (ललिता ताम्हाणे).
🔺🔺🔺🔺🔺
“स्मिता-स्मृति-१९८७-८८” (गिरीश गांधी),
“स्मिता पाटील” (रेखा देशपांडे),
"स्मिता, स्मितं आणि मी" (ललिता ताम्हाणे).
🔺🔺🔺🔺🔺
कसलं अफलातून लिहितात तुम्ही . किंचित कंटाळा न करता सतत वाचत पुढे जावं आणि पूर्ण बायोग्राफी वाचून बघण्याचा एक वेगळाच अनुभव दिलात
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर
खूपच हृदयस्पर्शी लेख. लेखाची आपण केलेली मांडणी सुरेखच आहे पण मला आजही स्मिता पाटील आपल्यात नाहीत ह्यावर हा लेख वाचूनही विश्वास बसत नाही. स्मिताजी अजुन काही वर्ष जगल्या असत्या तर..... श्रीदेवी, माधुरी आणि अनेकांना आपली कारकीर्द खरोखर इतकी विस्तारित करता आली तरी असती काय? सगळा रुपेरी पडदाच त्यांनी व्यापून टाकला असता . धन्यवाद जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला.प्रा. जसवंतसिंह राजपुत नेरूळ नवी मुंबई
उत्तर द्याहटवा