फुलवेडा सातपुडा !
तोरणमाळच्या पर्वतरांगांत आणि सातपुड्याच्या कुशीत विसावलेल्या फुलांचे
रंगवैभव तसे प्रत्येक ऋतूत वेगळे असते. पडत्या पावसातल्या तोरणमाळचे दर्शन घेताना
सातपुड्याची सारी हिरवाई थेट डांबरी रस्त्यांवर उतरलेली असते. मात्र अंगावर पाऊस
झेलणारा सातपुडा एका ध्यानस्थ योग्यागत हिरवा शेला पांघरून पावसाचे अनवट संगीत
ऐकण्यात आणि भोगण्यात मग्न झालेला असतो. पावसाची पावले श्रावणाकडे झुकतात, तेव्हा मात्र या हिरवेपणाला एक नवा आयाम मिळतो आणि त्यानंतर
सुरू होणारे ऋतुचक्र थेट माघ,फाल्गुनापर्यंत अविरत सुरू राहते. पानगळींचे दिवस
असले तरी सातपुडा फुलत असतो. फुलत राहतो.
🔺🔺🔺🔺🔺
तोरणमाळच्या गोरक्ष
कुटी विश्रामगृहातील एक सूर्यस्नात सकाळ. सातपायरी घाट ओलांडून जंगलात प्रवेश केला, तेव्हा पावसाळ्यातला उमदा हिरवाकंच सातपुडा रंगवैभवात दरवळत
होता. फुलपाखरांचे थवे झाडाझुडपांशी खेळ मांडून आपल्या विविध रंगसंगतीचे मनोहारी
दर्शन देत बागडत होते. या फुलपाखरांत फिक्कट पिवळ्या रंगांच्या छोटेखानी पतंगांचा
भरणा अधिक. कृमी-कीटकांचे विश्व सजीव झालेले अन् रानझेंडूंचे ताटवे रस्त्याच्या
दोन्ही बाजूला फुललेले.
अचानक एका ऐनाच्या झाडाकडे नजर गेली आणि दृष्टी स्थिरावली.
कळलावीला बहर आलेला होता. पाच परागकोषांच्या पिवळ्या दांड्या आणि त्यावर उभे असलेले
कातरलेल्या पाकळ्यांचे पिवळे-लाल गुलाबी फूल. वेलींच्या एका दांड्यावर उभे
असलेले. कळलावी म्हणजे ग्लोरीओसा सुपर्वा. मेळघाट आणि सातपुड्याचा प्रदेश
सोडल्यास इतरत्र अस्तित्वाच्या धोक्यात आलेले हे फूल. कळलावीची पाने लांबट
त्रिकोणी टोकावर वळलेली. पानांच्या या नाजूक वळणांनी कळलावी इतर वृक्षांचा आधार
घेते. कळलावीच्या फुलांचे सौंदर्य म्हणजे सातपुड्यातील अप्रूप. मेळघाटातील
फुलांना आकार येतो त्या बहराच्या भरात कळलावी फुलते. उभट फुलपात्राप्रमाणे फुलाचा
आकार आणि लांबट शंखाकृती कळ्या. कळ्या फुलण्याच्या बेतात असतात तेव्हा त्यातून
पिवळेपणा उमटतो. फूल फुलते तेव्हा कळलावीच्या पानांच्या पाकळ्या धुंद लाल सजतात.
कळलावीचे फूल म्हणजे मेळघाटातील अनुपम सौंदर्य. मात्र गणेशाला प्रिय असलेल्या या
फुलाला सातपुड्यातील आदिवासी ‘झगडाझगडी’चे फूल म्हणतात.
घरात हे फूल आणत नाहीत. घरात फूल आणले तर घरात भांडणे होतात हा समज. शेजारच्या
घरात भांडणे व्हावीत म्हणून आदिवासी लोक गमतीने हे फूल शेजारच्या घरात फेकतात.
फुलाचे नावच कळलावी. मात्र एखाद्या युवकाची भेट घेतली म्हणजे ती तरुणी त्या
युवकाशी विवाह करण्यास उत्सुक आहे, असा अर्थ त्या कृतीने काढला जातो. घरात भांडणे लावणारी कळलावी, एखाद्या युवतीने केसात माळली तर त्या फुलाच्या सौंदर्याचा
अर्थ खुलतो. एरवी मात्र कळलावी बदनाम. गणेशाला अर्पण केल्या जाणाऱ्या या कळलावीने
खरे म्हण सातपुड्यातील जे साऱ्यांनाच मोहित
केलेले असते; परंतु
तिच्याविषयी असलेल्या गैरसमजामुळे कळलावीची फुले अद्याप सातपुड्यातच सीमित आहेत. कळलावीची वेल मुद्दाम कोणी घरात लावत नाही. मात्र
भाद्रपद-आश्विनात सातपुड्यास भेट देणारा प्रत्येक पर्यटक या फुलांच्या सौंदर्याने
वेडावून जातो.
तोरणमाळच्या पर्वतरांगांत आणि सातपुड्याच्या कुशीत
विसावलेल्या फुलांचे रंगवैभव तसे प्रत्येक ऋतूत वेगळे असते. पडत्या पावसातल्या
तोरणमाळचे दर्शन घेताना सातपुड्याची सारी हिरवाई थेट
डांबरी रस्त्यांवर उतरलेली असते. मात्र अंगावर पाऊस झेलणारा सातपुडा एका ध्यानस्थ
योग्यागत हिरवा शेला पांघरून पावसाचे अनवट संगीत ऐकण्यात आणि भोगण्यात मग्न झालेला
असतो. पावसाची पावले श्रावणाकडे झुकतात, तेव्हा मात्र या हिरवेपणाला एक नवा आयाम मिळतो आणि त्यानंतर सुरू होणारे
ऋतुचक्र थेट माघ-फाल्गुनापर्यंत अविरत सुरू राहते. पानगळींचे दिवस असले तरी
सातपुडा फुलत असतो. फुलत राहतो.
सातपुड्याच्या फुलण्याची वैशिष्टे अनेक आहेत. सातपुड्यात आढळणाऱ्या ६६८ प्रजातींच्या वनस्पतींपैकी फारच थोड्या वनस्पती अशा
आहेत, की ज्यांचे बहर अनुल्लेखित
राहतात. सातपुड्याचे वैशिष्ट्य म्हणजे सातपुड्यातील साग. ऑगस्ट-सप्टेंबरात सागाला तुरे येतात आणि सातपुड्यातील सागांचे
हे शिरोटोक आकाशाला भिडत असतात. या पांढऱ्या शिरोटोकांवर जलवर्षांव करणारे मेघ या
फुलांचे स्पर्श झेलण्यासाठी अवघ्या सातपुड्यावर झुकलेले असतात. सागवानाचा
मोहर एक सुंदरसा भावानुवाद सातपुड्याला बहाल करतो. आकाशाला भिडणाऱ्या सागांवर अमृताभिषेक होत
असतानाच जमिनीवर अंथरलेल्या गवताझुडपांवर एक रंगोत्सव या वेळी सुरू असतो आणि
वेगवेगळ्या रंगांची विविध फुले जमिनीवर फुललेली असतात. रानझेंडू आणि विविध रंगांची
तेरडी कधी कधी गवतफुलांना झाकून टाकते. मात्र त्यातूनही कपाळाच्या लाल-शेंदरी
ठिपक्यांची फुले चटकन ध्यानात येतात. ही कोणती गवताळ फुले? सातपुड्यात सुमारे
पंचवीस ते तीस प्रकारची अशी गवताळ फुले आढळतात आणि श्रावण-भाद्रपदात त्यांना
कुंकवाच्या रंगाची, विविध आकाराची
फुले येतात.
ऑगस्ट-सप्टेंबरात सातपुड्यात फुलांची एक कवायत सुरू असते
आणि नीटनेटक्या पांढऱ्या फिक्कट गुलाबी झगे घातलेल्या मुलींचा एक-एक गट एका
शिस्तबद्ध लयीत वाऱ्याशी झुलताना दिसतो. ही भुमक्याची (कॉसटॉस) फुले. पांढरी
फिक्कट गुलाबी आणि किरमिजी रंगाची ही फुले एका दांडीवर फुलतात. कळ्यांनी लदबदलेली
ही दांडी भुमक्याच्या झुडुपी कंदातून वर आलेली असते. दांडीला गोलाकार मोठी फुले
असतात आणि ही फुले क्रमाने खालून वपर्यंत उमलत जातात. एका शिस्तीत ज्या ठिकाणी
कॉसटॉसच्या झुडूप कंदाचा प्रादुर्भाव अधिक असतो तेथे कवायत करणाऱ्या एका वेषातील
मुलींचे गट असल्यागत उमललेली ही फुले दिसतात. या सुंदर फुलांना सुगंध मात्र अजिबात
असत नाही.
कॉसटॉस आणि कळलावीसोबत ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये फुलणारे सातपुड्यातील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण फूल म्हणजे रानहळदीचे फूल. रानहळदीच्या केळीचा रेषांचा आकार असलेल्या कंदावर
मुळापासून सुमारे सहा ते आठ इंच उंचीवर उमलणारे रानहळदीचे फूल म्हणजे फुलाच्या
आतला गर्भाकार बलांच्या तोंडासारखा दिसतो. बलाची शिगे आणि निमुळते तोंड या फुलात दिसते.
म्हणून आपला हरवलेला बल रानहळदीच्या फुलात जाऊन लपला असे भाबडे आदिवासी समजतात.
रानहळदीच्या या फुलांचा आकार अतिशय नाजूक आणि छोटेखानी असला तरी फुलांमध्ये
आकर्षकता एवढी जबरदस्त असते, की जेथे रानहळद उमलली असेल, तेथे फुलांची एका विशिष्ट उंचीवरील एक ओळ स्पष्ट दिसते. रानहळदीच्या एका
अंगाला उमलणारी ही फुले, एक वेगळी
जाग अवघ्या सातपुडय़ाला देत असतात.
श्रावण-भाद्रपद ते आश्विनपर्यंत फुलणाऱ्या रानगवताच्या आणि
झुडपा-वेलींच्या फुलांसोबत मेळघाटात फुलणारी इतर झाडे म्हणजे पारिजातक आणि कचनार.
नारंगी देठांचे आणि पांढऱ्या नाजूक पाकळ्यांचे पारिजातक या वेळी सातपुड्यात सुवासाची खैरात
करीत असतात. सातपुड्यात किती तरी ठिकाणी पारिजातकांची दाटी आढळते आणि स्वर्गातून
अवनीवर उतरलेल्या पारिजातकांच्या फुलांचा सडा या दाटीत सांडला जातो.
सप्टेंबरात कचनारच्या कळ्या उमलू लागतात आणि सारा वृक्ष या
नाजूक कळ्यांनी लदबदून जातो. सातपुड्यात आढळणाऱ्या कचनारच्या तीन जातींपकी फिक्कट गुलाबी रंगाचा
कचनार आणि पाच पाकळ्यांपकी एक गर्द जांभळी पाकळी असणारा कचनार वृक्षसौंदर्याला एक
नवा आयाम देऊन जातो. कचनारच्या सौंदर्याची तारीफ करावी ती कवींनी! अनेक
लोकगीतांमधून कचनारचे सौंदर्य विविधतेने मांडले गेले आहे.
दिवस विश्वमित्री उन्हाकडे वळतात. सांबर-काळविटांच्या पाठी
काळ्या पडतात आणि जंगल अधिक काळपट पडते; तेव्हा सातपुड्यातील लहानमोठ्या वृक्षांना बहर येऊ लागतो. रानमोगरा फुलू लागतो आणि
रानमोगऱ्याच्या पांढऱ्या सुगंधी फुलांचे ताटवे सातपुड्यात दिसू लागतात.
रानमोगऱ्यासारखीच आणखी आकर्षक फुले म्हणजे मोर वेलची किंवा निळीची फुले. ही फुले
सातपुड्यातील आदिवासींना भाजी पुरवितात. गुलाबी रंगाची निळीची फुले. सातपुड्यातील आदिवासी मोठ्या आनंदाने गोळा
करतात. शेंदरी मखमली रंगाचा पिज आत्ताच फुलतो. याचे बंद फूल एका वेगळ्या आकाराचे दिसते.
औषधी मुरडशेंगेला याच वेळी लालसर फुले येतात.
सातपुड्यातल्या ६६८ प्रजातींपकी ज्या झाडाझुडपांची आणि वेलींची फुले त्या त्या ऋतूत आकर्षक
असतातच. त्यात कळलावी, सेमल, भुमका, गण्हेर, मेडिशग, टेटू, खडिशग, पारिजातक, जलकुंभी, चारोळी, गोकर्णी, नीळ, मोखेल, कचनार, सफेद मुसळी, धायटी, पिज, गेळफळ, अमलताश, बांदी, वाघनखी, रानहळद, रानकपाशी, मुरडशेंग, भिंगरी, फेटरा, भुईिरगण, चित्रक, धामण, आरंग, रानभेंडी, गणेशपुष्प
(आयपोमिया), कळंब, गुबागळ, मदालकडी (लेंजा), होंबा, जामरसी, रानकेळ, भुईसाग, कुडा, दुधी, खाजकुयरी, भंजार, रोव्हिट, माहुलवेल, पाडर, शिवण, तेरडी, मालकांगण आणि तिवसाचा अवश्य उल्लेख व्हावयास हवा. त्यातल्या
त्यात सेमल, कळलावी, गण्हेर, कुंभी, कचनार, पिज, गेळफळ, अमलताश, रानकापूस, गणेशपुष्प (आयपोमिया), होंबा, खाजकुयरी आणि
तिवस ही सातमाळा पर्वतातील फुलांतील वैशिट्यपूर्ण फुले. सातपुड्यातील या
रंगोत्सवाचे वैशिष्ट्ये म्हणजे हा रंगोत्सव संपूर्ण ऋतुचक्रावर अधिराज्य गाजवीत
असतो. हे ऋतुचक्र खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष सृजनाशी संबंधित असते आणि या
रंगोत्सवाचा संबंध केवळ झाडाझुडपांपुरता मर्यादित नसतो. किडामुंगीपासून ते मोहक
पक्ष्यांपर्यंत आणि झुळझुळणाऱ्या वाऱ्यापासून ते भिरभिरणाऱ्या फुलपाखरांपर्यंत
साऱ्यांना आकर्षति करणारी फुले; त्यामुळे गुणसूत्रांची अदलाबदल करण्यास एकमेव आधार ठरतात. गुणसूत्रांच्या
अदलाबदलीच्या प्रक्रियेतील एक भाग म्हणूनच सातपुडय़ात ही सूर्योपासक फुले, मना, रोझी पास्टर, गोल्ड ओरियल आणि
इतर किती तरी पक्ष्यांना आकर्षति करतात.
वृक्ष प्रकारात मोडणाऱ्या सातपुड्यातील झाडांना साधारणत:
जानेवारीपासून फुले येतात आणि हा बहर वेगवेगळ्या झाडागणिक एप्रिल ते मेपर्यंत
टिकून राहतो. फेब्रुवारी ते मार्चदरम्यान फुलणारे अमलताश हे त्यातील वैशिष्ट्यपूर्ण फुलझाड. फिक्कट गुलाबी किंवा जांभळट गुलाबी छटा घेतलेली फुले असतात आणि सारे
झाड केवळ फुलांनी आच्छादलेले असते. तोरणमाळ, शहादा रस्त्यावर सातपायरी घाटात तिवसाची अनेक झाडे आहेत. जांभळट गुलाबी
फुलांनी आच्छादलेले हे झाड एका समाधीस्थ आनंदात सातत्याने डुलताना दिसते.
अमलताश म्हणजे इंडियन लॅबरनम. या फुलांना चिनी कंदीलही
म्हणतात. अमलताशची शेंग अस्वलांना खूप आवडते. अमलताशचे पिवळ्या फुलांचे झुंबरी घोस
हे उन्हाळ्यातील सातपुड्याचे एक आगळे वैशिष्ट्य. अमलताश फुलतात त्या वेळेस टेटूच्या झाडांनाही फुले येतात.
तांबट मिटकरी रंगाच्या टेटूच्या फुलांचा झुपकेदार तुरा एक अवर्णनीय आनंद देऊन
जातो. मेडिशगीची पांढरी फुले आणि खडिशगीची फिकट पिवळसर फुले याच ऋतूत फुलतात.
शिवरात्रीच्या सुमारास फुलणारी गण्हेरीची फुले हे सातपुड्यातील
वृक्षसंपदेचे आणखी एक वैभव. ही फुले महादेवाला वाहतात, म्हणून त्यांना धार्मिक महत्वही आहे. गोंगल या नावाने ओळखली
जाणारी गण्हेर फुलते तेव्हा झाडावर एकही पान शिल्लक नसते. सारा आकार पिवळ्या
फुलांनी भरलेला असतो. गण्हेरीला लागणारे फळ नारळाएवढे मोठे असते.
सातपुड्यातल्या वृक्ष प्रजातींतील आणखी दोन आकर्षक फुलझाडे म्हणजे होंबा आणि कुंभी. सरळसोट
उंच वाढणाऱ्या होंब्याची फुले हिरवट-पिवळसर असतात. झाडाच्या उंच फांदीवरून एक लांब
आणि जमिनीकडे वळणारी दांडी घेऊन त्या त्या दांडीला ही लोंबणारी फुले लागतात.
दांडीची लांबी आणि झाडाचा आकार यांच्या तुलनेत फुले लहानखुरी वाटतात; परंतु होंब्याच्या हिरवट-पिवळसर फुलांचा रंग आणि आकार
आकर्षक असतो.
कुंभी आणि जलकुंभी ही सातपुड्यातील आकर्षक व उपयुक्त वृक्षसंपदा, अकोट हरीसाल रस्त्यावर नदीच्या पात्रालगत जलकुंभीची अनेक
झाडे आहेत. फुले हिरवट-पिवळसर आणि मध्यभागी गुलाबी. फुलांचा आकार कृष्णकमळाच्या
फुलासारखा; परंतु असंख्य
रेषांनी दाटलेला. कुंभीची फुले पांढरट गुलाबी. गोलाकार फुलांना वास नसतो. पोपटी
पानांच्या कुंभी, जलकुंभीवर फुले
येतात तेव्हा पानांच्या बेचक्यात एक सुवासिक प्रसाद मांडल्याचा भास होतो.
फूल म्हणून आकर्षक नसले तरी सातपुड्याच्या फुलांचा
गोषवारा मोहाच्या फुलांचा उल्लेख केल्याशिवाय संपणार नाही. मोह फुलतो तेव्हा सारा
सातपुडा एका उन्मत्त मादक सुगंधाने भारून जातो. शिवाय मोह म्हणजे आदिवासींचे जीवन.
मोहाच्या भाकरी, मोहाचे लाडू आणि
मोहाचे मद्य यांचा आणि आदिवासींचा अतूट संबंध; त्यामुळे मोह फुलतो आणि फुले गळू लागतात. तेव्हा
वेचण्यासाठी आदिवासींची लगबग सुरू असते. अशा वेळी कित्येकदा या आदिवासींना
अस्वलांशी सामना करावा लागतो.
शुष्कपर्णी पानगळीचा सातपुडा. उन्हाळ्यात उघडाबोडखा होऊन
रखरखता दिसतो, तेव्हा अमलताश, टेटू, कुंभी, जलकुंभी
यांच्यासोबत पळसाची जिवणी स्फुरू लागते आणि रंगपंचमीच्या भराला पळस फुलतात. सोबत
निळा जॅकरंडा असतो. केशरी पळसाची फुले त्यानंतर साऱ्या सातपुड्याला एक वेगळा
आयाम देत असतात. पळसाची फुले गळू पडतात आणि सायंकाळचा सूर्य आपली किरणे आवरून घेत
असतो तेव्हा एक पारदर्शक रंगपंचमी सातपुड्याच्या खडकाळ जमिनीवर उमटलेली
दिसते.
रणजितसिंह राजपूत
एकदम मस्त ! अगदी बिनचूक !!
उत्तर द्याहटवानिसर्ग सौंदर्याला साहित्याची फोडणी !!!
निसर्गाने सातपुडा किती छान निर्मिला पण मानवाला त्याची किंमत कळलीच नाही
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेख ,
उत्तर द्याहटवा