आदिम भक्तीची वर्षं पाच हजार, अटकेपार 'गणराज' स्वार !
गणराज अनादि
आहे, इतिहास याचे पुरावे देतो. त्याची पूजा होत असल्याचे प्रमाण पाच हजार
वर्षापूर्वीपासून सापडते. तो वेगवेगळ्या रुपांत, आगळ्या-वेगळ्या स्वरूपात आणि
विविध संस्कृतींमध्ये दिसून येतो.
जपानमध्ये त्याला कांगीतेन म्हटले जाते. चीन अफगाणिस्थान, इराण व मेक्सिकोच्या
माया संस्कृतीतही गणेशमूर्ती होत्या. तर दीड हजार वर्षांपूर्वी आग्नेय
आशियातील विविध प्रदेशांतून भारतीय संस्कृती बहरू लागली होती. त्यात भारत
वगळता विद्यमान नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान,
श्रीलंका, म्यानमार, चीन,
जपान, कंबोडिया, व्हिएतनाम,
इंडोनेशिया, बोनिओ इत्यादी देशांमध्येदेखील
इतर भारतीय देवदेवतांसोबत गणराज लोकप्रिय होते...
जगात बहुधर्मीय अधिष्ठान असणारा गणपती हा सर्वात लोकप्रिय देव आहे. कार्यारंभी गणपतीचे
केले जाणारे पूजन, त्याला पंचायतनात मिळालेले स्थान आणि
त्याचा असणारा गाणपत्य पंथ यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये त्याला महत्त्वपूर्ण देवता
मानले गेले. हिंदू धर्माबरोबरच त्याला बौद्ध आणि जैन धर्मातही महत्त्वाचे स्थान
मिळाले. गणेशाचा प्रसार प्राचीन काळातच भारताच्या भौगोलिक सीमा
ओलांडून पलीकडे गेलेला होता. खुष्कीच्या मार्गाने प्राचीन भारतीय व्यापारी
सध्याच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण तसेच मध्य
आशियातील उझबेकिस्तान या भागांतून प्रवास करत असताना त्यांच्यासोबत भारतीय संस्कृती आणि धर्माचा प्रसार आपसूकच होत होता.
सिंधू खोऱ्यापासून माया संस्कृतीपर्यंत गणेशपुजेची प्रमाण सापडली आहेत. हडप्पा
संस्कृतीतही गणपतीची प्रतिमा सापडली होती.
मायथॉलॉजी व सिम्बॉलिझमचे तज्ञ लायर्ड स्क्रॅटन यांचे पुस्तक ‘पॉइंट ऑफ
ओरीजनल : गोओबलकी टिपे अँड स्पीरिच्युअल मॅट्रिक्स फॉर द वर्ल्ड कॉस्मॉलॉजी’ नुसार
इसविसनपूर्व ३००० मध्ये गणेश पूजेचा उल्लेख आढळतो. चीन मधील मेगा लेणीत सहाव्या
शतकातील गणेशाची पेंटिंग सापडली आहेत. ही बौद्ध लेणी आहे. येथे बौद्ध धर्माशी
संबंधित हजारो चित्रे आहेत. या लेणीच्या २५ किलोमीटरच्या क्षेत्रात ४९२ मंदिरे
आहेत. बौद्ध धर्मानेच येथे गणेशपुजेची सुरुवात केली, असे मानले जाते. चीनमधून येथे
गणपती आले आहेत. त्यामुळेच जपानमध्येही १२०० वर्षे प्राचीन गणेशाची मूर्ती व
चित्रे सापडली आहे. सुमारे १८०० वर्षांपूर्वी प्राचीन भारतातील रहिवाशांनी
सागरीमार्गाने व्यापारानिमित्त आग्नेय आशियात प्रवेश केला आणि भारतातील बौद्ध धर्म
आणि हिंदू धर्मातील शैव, वैष्णव, शाक्त
पंथदेखील या व्यापाऱ्यांसोबत आग्नेय आशियातील अनेक देशांमध्ये पोहोचले. तेथील
स्थानिक संस्कृतीतील अनेक राजांनी या भारतीय धर्मांचे पिढ्यानपिढ्या अनुसरन
केल्याचे तेथील
भारतीय मंदिरे,
देवी-देवतांच्या मूर्ती आणि शिलालेखांवरून लक्षात येते.
भारतातील प्राचीन साहित्य ऋग्वेदामध्ये बृहस्पती अथवा ब्रह्मणस्पती याचे वर्णन
आहे, परंतु ते गजमुख गणेशाचे वर्णन नाही. इतकेच
नाही तर ऋग्वेदामध्ये इंद्राला ‘गणपती’ म्हटले आहे. अथर्ववेदात येणाऱ्या पापमोचनसुक्तामध्ये ८५ देवतांचा उल्लेख
आहे. त्यात ब्रह्मणस्पती आहे, परंतु गणेश किंवा गणपती यांचा
उल्लेख नाही. यावरून वैदिक वाङ्मयामध्ये गणपती हे गणांचा अधिपती या अर्थाचे विशेषण
म्हणून येते, हे स्पष्ट आहे. गणेश हे नाव वैदिक वाङ्मयामध्ये
कुठेही आढळत नाही, हेही या निमित्ताने समजून घेणे महत्त्वाचे
ठरावे. यानंतर प्रसिद्ध झालेले नाव म्हणजे विनायक. हे नाव ‘मानव
गृसूत्र’ या ग्रंथात येते. यात वर्णन केल्याप्रमाणे एकूण चार
विनायक आहेत: शालकंटक, देवयजन, उस्मित
आणि कुष्माण्डराजपुत्र. यातही गणेश हे नाव येत नाही. तसेच विनायक गजमुख आहे,
असेही वर्णन येत नाही. हे चारही विनायक लोकांच्या कार्यात विघ्न
आणायचे. याच सूत्रात या विनायकांची शांती कशी करावी याबद्दल माहिती दिली आहे. इसवी
सनाच्या दुसऱ्या/तिसऱ्या शतकातील बौधायन गृह्य़ परिशेष कल्प या ग्रंथात चार
विनायकाच्या एकत्रीकरणातून एकच एक विनायक तयार होतो व त्याला हस्तिमुख म्हटलेले
आहे. याच काळातील इतर ग्रंथांमध्ये विघ्न आणि विनायकाला गजमुख म्हटलेले दिसते.
मूळच्या विघ्न निर्माण करणाऱ्या विनायकाची शांती करून त्याला प्रसन्न करून घेता
येते व त्यानंतर तो विघ्नांचे हरण करतो अशी मान्यता रूढ झाली. नंतर इसवी सनाच्या दुसऱ्या/तिसऱ्या शतकात त्याला
गजमुख किंवा गजानन म्हणून संबोधले जाऊ लागले व त्याच काळात त्याच्या मूर्ती
घडवल्या जाऊ लागल्या.
भारताच्या वायव्येला असणाऱ्या सध्याच्या पाकिस्तानातील गांधार प्रदेशातील
जमातींमध्ये पवित्र असणाऱ्या हत्तीचे लौकिक देवतेत रूपांतर होऊन त्याला गजमुख आणि
मानवी शरीर अशा स्वरूपातील एक यक्ष असे रूप देऊन, त्याची
सांगड विनायक, गणेश व गणपतीशी घालण्यात आली असावी या
निष्कर्षांप्रत डॉ. ए. के. नरेन व डॉ. म. के. ढवळीकर हे तज्ज्ञ येऊन पोचले. भारतात
प्राचीन काळी हत्ती हा पवित्र प्राणी मानला जात असावा. भगवान बुद्धाच्या जन्माच्या
आधी त्यांच्या आईला स्वप्नात हत्ती दिसल्याचे उल्लेख आहेत. यावरूनच सम्राट अशोकाने
संकिशेच्या अशोकस्तंभावर हत्तीचे शिल्प उभारले असावे. सम्राट अशोकाच्या कलसी
(उत्तराखंड) येथील शिलालेखाशेजारी एका हत्तीचे सुबक रेखाचित्र कोरलेले आहे व सोबत ‘गजतमे’ असा तत्कालीन ब्राह्मीलेख कोरलेला आहे. गजतमे
म्हणजे गजोत्तम अर्थात सर्वात उत्तम हत्ती! यावरून तत्कालीन समाजात हत्तीला
महत्त्वाचे स्थान असावे असा अंदाज बांधता येतो. इसवीसनाच्या पहिल्या ते तिसऱ्या
शतकात उत्तर भारतात कुशाण सत्ता होती. या कुशाण राजांच्या नाण्यांवर स्कंद,
कुमार, विशाख आणि महासेन अशा चार देवतांचे
अंकन दिसून येते. या चार देवतांच्या एकत्रीकरणातून कार्तिकेय हा एकच एक देव झाला व
ही चार त्याची नावे ठरली. याच काळात चार विनायकांचा मिळून एक विनायक अथवा गणपती
बनला आणि यानंतर निर्माण झालेल्या अनेक पुराणांमधून या गणेशाबद्दलच्या अनेक
पुराणकथा उदयाला आल्या.
शुआन जांग (ह्युएन त्सांग) या चिनी बौद्ध भिक्षूने इसवीसनाच्या ७ व्या शतकात
भारतास भेट दिली तेव्हा तो तक्षशिला (आता पाकिस्तानात) व कपिशा (अफगाणिस्तानातील
विद्यमान बेग्राम) येथेही गेला. या दोन्ही ठिकाणची नगरदेवता हत्ती आहे, असे त्याने लिहून ठेवले आहे. तसेच या कपिशानगराच्या नाण्यावर
हत्तीचे प्रतिमांकन असून त्यावर ‘कपिशिये नगरदेवता’ (म्हणजे कपिशेची नगरदेवता) असा त्या नाण्यावर खरोष्टी लिपीमध्ये लेख आहे.
शुआन जांगच्या (ह्युएन त्सांग) म्हणण्यानुसार कपिशेच्या नर्ऋत्येला असणाऱ्या
डोंगरात या हत्तीरूपी देवतेचा निवास होता व त्यास ‘पिलो शो
लो’ (प्राकृतमध्ये पिलूसार पिलू म्हणजे हत्तीशी संबंधित नाव)
असे नाव होते. पाकिस्तानातील पुष्कळावती (आताचे चारसाढा) येथे सापडलेल्या
नाण्यावरही ‘पुष्कलावती नगरदेवता’ असे
लिहिलेले असून त्यावर हत्तीचे शीर्ष, डोंगर व मानवाकृती आहे.
रॅपसन या संशोधकांनी हे प्रतिमांकन शुआन जांगने वर्णन केलेल्या हत्तीरूपी देवतेचे
म्हणजेच ‘पिलो शो लो’चे आहे हे सिद्ध
करून दाखवले. यावरून सध्याच्या पाकिस्तान व अफगाणिस्तान या भागांत प्राचीन काळी
हत्ती हा पवित्र प्राणी मानला जाऊन अनेक नगरांची देवता म्हणून पूजलाही जात असावा
हे सिद्ध होते !
अर्थात अफगाणिस्तानात हत्ती कसे आले, असा प्रश्न
पडू शकतो. पर्शियन राजा पहिला दरायस याने इसवीसनापूर्वी ६ व्या शतकात सिन्धूच्या
खोऱ्यातील गांधार प्रदेश जिंकून पर्शियन साम्राज्याला जोडला, कदाचित त्यानंतर भारतीय हत्तींचा वापर पर्शियन साम्राज्यात सुरू झाला असावा. हे पर्शियन
साम्राज्य आत्ताच्या तुर्कस्थानपासून, उत्तर इजिप्त व सौदी
अरेबिया व्यापून अफगाणिस्तान व पाकिस्तानपर्यंत पसरलेले होते. इसवीसनापूर्वी
चौथ्या शतकात पर्शियन राजा राजा तिसरा
दरायस व अलेक्झांडर यांच्या झालेल्या युद्धात पर्शियन सैन्यात १५ भारतीय हत्ती वापरले गेले होते, असा ग्रीक इतिहासकारांनी उल्लेख केला आहे. तसेच अलेक्झांडर आणि पोरस या
दोघांमधील झेलम नदीच्या काठी झालेल्या युद्धात पोरसने हत्तींचा वापर केला होता,
असेही ग्रीक इतिहासकार सांगतात. यावरून सध्याच्या इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या प्रदेशात इसवी सनापूर्वी चौथ्या शतकात
भारतीय हत्ती केवळ माहीत होते असे नव्हे, तर ते युद्धातील
वापरासाठीही प्रसिद्ध होते. इसवीसनानंतरच्या तिसऱ्या/चौथ्या शतकातही पर्शियन
राजांनी हत्ती व त्यांचे माहूत भारतातून आणल्याचे उल्लेख आढळतात. यावरून सध्याच्या
अफगाणिस्तान व पाकिस्तानच्या हद्दीच्या प्रदेशातील काबूल नदीच्या खोऱ्यात
राहणाऱ्या लोकांना इसवीसनापूर्वी ६ व्या शतकापासून हत्ती माहीत होता, हे लक्षात येते.
पाणिनी या संस्कृत व्याकरणकाराने इसवीसनापूर्वी ५व्या शतकात लिहिलेल्या ‘अष्टाध्यायी’ या ग्रंथात हत्तीचा तसेच
हास्तिनायनांच्या जमातीचा उल्लेख आहे. पाणिनी हा अटक, पेशावर
या भागातील रहिवासी होता. त्यामुळे त्याने केलेला हत्तीचा व हास्तिनायनांचा उल्लेख
महत्त्वाचा ठरतो. याच हास्तिनायनांचा उल्लेख अलेक्झांडरच्या ग्रीक इतिहासकारांनी व
नंतरच्या काळात रोमन भूगोलकारांनी व इतिहासकारांनी ‘अस्तेकनॉय’
असा करून त्यांची वसाहत काबूल व स्वात नद्यांच्या खोऱ्यात होती व
पुष्कळावती ही त्यांची राजधानी होती, असेही नमूद केले आहे.
या हास्तिनायनांचे कुलचिन्ह हत्ती असावे आणि म्हणून त्यांच्या जमातीचे नावही
हत्तीवरून पडलेले दिसून येते.इसवीसनापूर्वी पहिल्या शतकात फिलोस्ट्रटस नावाच्या
ग्रीक लेखकाने तक्षशिलेचे वर्णन करताना तेथील एका दीर्घायुषी हत्तीचे वर्णन केले
आहे. हा हत्ती पोरसशी तह केल्यानंतर अलेक्झांडरने तक्षशिलेतील सूर्यमंदिराला अर्पण
केला होता. तक्षशिलावासी या हत्तीची पूजा करत. या हत्तीच्या गळ्यातील घंटेचे
वर्णनही या ग्रीक लेखकाने केले आहे. याच प्रदेशात अलेक्झांडरनंतर आलेल्या
डिमीट्रीयस (पहिला), मिनेंडर, राजांनी
(इसवीसनपूर्व दुसरे व पहिले शतक) या भागातील पवित्र हत्तीरूपी देवतेच्या
छत्रछायेखाली आपण सुरक्षित आहोत हे दाखवण्यासाठी जणू हत्तीचे शिर हे शिरोभूषण
म्हणून नाण्यांवर वापरले. या इंडोग्रीक राजांची नाणी अत्यंत सुबक असत. त्यात एका
बाजूला राजाचा मुखवटा असे. या राजाच्या मुखवट्यावर शिरोभूषण म्हणून हत्तीचे शिर
वापरलेले दिसते. अर्थात या पवित्र हत्तीच्या कृपेमुळे आपल्याला यश मिळो, अशी भावना त्यात असू शकते. याच भावनेचा अंतर्भाव कार्य यशस्वी करण्यासाठी
केल्या जाणाऱ्या गणेशपूजनात दिसतो.
अशा पद्धतीने हत्ती या पवित्र प्राण्याचा, लौकिक
देवतेच्या स्वरूपात प्रवास सुरू झाला. यापुढील टप्पा म्हणजे गजमुख व मानवी शरीर या
स्वरूपातील गजयक्षाचे प्रतिमांकन. हम्रेस (इ.स.पूर्व ५०) या इंडोग्रीक राजाच्या
नाण्यावर एका बाजूला राजाचा मुखवटा व दुसऱ्या बाजूला सिंहासनावर बसलेली देवता
यांचे अंकन आहे. प्राध्यापक अवधा किशोर नारायण यांच्या मतानुसार या देवतेचे शिर
हत्तीचे आहे. त्यांचे हे मत ग्राह्य मानले तर गजाननाचे हे सर्वात प्राचीन प्रतिमांकन
आहे. अर्थात सर्व संशोधकांना ही देवता गजमुख आहे असे वाटत नाही. काहींच्या
म्हणण्यानुसार ही मानवी चेहऱ्याची देवता आहे.
यानंतरच्या काळातील अँटी अल्कायड्स या इंडोग्रीक राजाच्या तसेच शकराजा मोयस
याच्या नाण्यांवर हत्तीला विशेष स्थान मिळाले. या नाण्यावर हत्तीचे पुढचे शरीर
दिसत असून त्याची सोंड उंचावलेली आहे. या सोंडेत त्याने हार धरलेला आहे. तसेच
हत्तीच्या गळ्यातील घंटा यात स्पष्ट दिसते आहे. या हत्तीच्या पुढे ग्रीक देवतांचे प्रतिमांकन
असल्यामुळे हत्तीला या देवतांच्या बरोबर स्थान मिळाले होते असे दिसते. अर्थात या
नंतर मूर्तीच्या स्वरूपात आपल्याला गजमुखी यक्ष दिसू लागतो. गणेशाच्या मूर्तीचे वैशिट्य
म्हणजे ठेंगणा बांधा, आखूड मंड्या, तुंदिलतनू, विशाल उदर, हीच वैशिष्ट्ये
प्राचीन यक्ष प्रतिमांचेदेखील आहेत. या बाबतीत गणपती आणि कुबेर यक्ष यांच्या
मूर्तीमध्ये साम्य आढळून येते. कुशाण राजांच्या काळात निर्माण झालेल्या काही
मूर्ती मथुरा संग्रहालयात आहेत. यावरून गजमुखी यक्ष अथवा आजच्या गजाननाच्या मूर्ती
इसवीसनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात निर्माण होत होत्या हे स्पष्ट होते. मथुरा
संग्रहालयातील या मूर्ती लाल दगडाच्या आहेत. संकिशा येथे मिळालेली उभी द्विभुज
गणेशाची मूर्ती. याच्या डाव्या हातात मोदकाची वाटी असून तिच्यावरच त्याने सोंड
टेकली आहे. उजव्या हातातील वस्तू ओळखता येत नाही. इतर तीन प्रतिमा द्विभुज असून
विशाल उदराच्या आहेत. यांच्या हातात मोदकपात्र असून सापाचे जानवे आहे. एकच दात,
सर्पजानवे, मोदकपात्र व अलंकारविहीन मूर्ती हे
या प्राचीनतम गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य आहे.
अफगाणिस्तान गणपतीचे उगमस्थान !
अफगाणिस्तानातील बेग्राम म्हणजेच प्राचीन काळच्या कपिशानगरीतील नाण्यावर हत्तीचे
प्रतिमांकन असून त्यावर ‘कपिशिये नगरदेवता’
असा खरोष्टी लिपीमध्ये लेख आहे. यावरून हत्ती हा या भागात पवित्र
प्राणी मानला जाऊन अनेक नगरांची देवता म्हणून पूजलाही जात असावा ! त्याचेच नंतर
गणपती या देवतेमध्ये रुपांतर झाले असावे, असा अभ्यासकांचा
अंदाज आहे. यानंतरच्या गणेशमूर्ती गुप्त राजांच्या काळात (इसवीसनाचे पाचवे /सहावे
शतक) दिसायला सुरुवात होते. उत्तर भारतात उदयगिरी, अहिच्छत्र,
भितरगाव, देवगढ, राजघाट
इत्यादी ठिकाणी या मूर्ती सापडल्या आहेत. या मूर्तींची वैशिष्ट्ये म्हणजे या गणपतीचे हत्तीचे शिर नैसर्गिक आहे. त्यावर
मुकुट अथवा अलंकार नाही. सर्व गणपती डाव्या सोंडेचे आहेत. देवगढ येथील
गणेशमूर्तीच्या हातात मोदकपात्र नाही, परंतु परशू , दात/मुळा घेतलेला दिसतो. मुळा हा गणपतीच्या लांच्छनापकी एक दाखवला जावा
असे प्राचीन ग्रंथातून नमूद केले आहे. त्याचीच जागा नंतर दाताने घेतली. या
मूर्तीच्या सोबत उंदीर नाही. या मूर्ती अलंकारविरहित आहेत, परंतु
सर्पजानवे मात्र आहे. तसेच उदयगिरी व काबूल येथे सापडलेली गणेशमूर्ती ऊर्द्वलागी
आहेत.
गणेशाच्या प्राचीन मूर्तीपैकी सर्वात महत्त्वाची मानली गेलेली मूर्ती म्हणजे
काबूल येथील महाविनायकाची प्रतिमा. पाकिस्तान व अफगाणिस्तान या भागांत हत्ती हा
पवित्र प्राणी व लौकिक देवता म्हणून पूजला जात होताच. त्यामुळे या भागात विनायकाची
प्रतिमा सापडणे अशक्य नाही. अफगाणिस्तानातील गार्देज या ठिकाणी २० व्या शतकात
सापडलेली ही महाविनायकाची प्रतिमा काबूलला आणण्यात आली. तेथे बाबा पीर रतनानाथ
दर्ग्यात तिची पुनर्स्थापना करण्यात आली व
तिथे तिचे १९७० च्या दशकापर्यंत पूजन होत होते. या प्रतिमेच्या बैठकीवर दोन ओळींमध्ये संस्कृत भाषेत व ब्राह्मी लिपीत
लेख कोरलेला आहे. ‘परमभट्टारक महाराजाधिराज शाही
खिंगल याने त्याच्या राज्याच्या आठव्या वर्षी महाज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल
पक्षातील त्रयोदशीला विशाखा नक्षत्रावर, सिंह लग्न असताना या
महाविनायकाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली’. हा शाही खिंगल
राजा कोण याबद्दल तज्ज्ञांमध्ये एकमत नाही, कारण त्या नावाचे
अथवा पदवीचे दोन राजे अफगाणिस्तानात हुणांच्या अल्कोन गटात आढळतात. या राजवटीतील
तोरमान आणि मिहिरकुल या राजांनी उत्तर भारतात शिरकाव केला होता व त्यांचे गुप्त
राजांशी युद्धही झाले होते, परंतु या मूर्तीच्या
शिल्पशैलीवरून व नाणकशास्त्रीय पुराव्यावरून ही मूर्ती हूण राजा खिंगल (इ.स.
४४०-४९०) अथवा त्याच्यानंतर आलेला नरेंद्र (इ.स. ५४०-५८०) यांच्या राजवटीतील असावी,
कारण ‘राजतरंगिणी’ या
काश्मीरमधील ग्रंथात नरेंद्र याचे नाव खिंगल नरेंद्रादित्य असे आढळते. तरीदेखील ही
महाविनायकाची मूर्ती हूणांच्या गटातील राजाने स्थापन केली होती ही महत्त्वाची बाब
नाकारता येत नाही. या मूर्तीचा काळ इ. सनाचे ५ वे अथवा ६ वे शतक असा येतो.
ही संगमरवरात घडवलेली महाविनायकाची मूर्ती (उंची २८ इंच व रुंदी १४ इंच) आलीढ
आसनात उभी आहे. कदाचित अफगाणिस्तानातील ग्रीक कलेच्या प्रभावामुळे या मूर्तीचे हात, पाय व छाती बऱ्यापकी पिळदार दाखवले आहेत. सोंड डावीकडे वळलेली
असून तुटली आहे. ही मूर्ती एकदंत आहे. डोक्यावर मुकुट असून गळ्यात हार आहे. हा
मुकुट रिबिनीने डोक्याच्या मागच्या बाजूला बांधला आहे. अशा पद्धतीने काबूल येथे
सापडलेल्या सूर्य मूर्तीचा मुकुटदेखील रिबिनेने बांधलेला कोरण्यात आला होता.
तत्कालीन पर्शियन राजे अशा पद्धतीने मुकुट
बांधत असत. त्यामुळे हा पर्शियन प्रभाव या गणेशमूर्तीवर दिसून येतो. या मूर्तीला
चार हात होते, पण ते तुटले आहेत. मूर्तीला सर्पजानवे घातले
असून कमरेखाली व्याघ्रचर्म नेसले आहे. मूर्ती लंबोदर व उर्ध्विलगी दाखवलेली
आहे.अफगाणिस्तानावरील सोव्हिएत आक्रमणानंतर १९८० मध्ये ही मूर्ती काबूलमधील
राष्ट्रीय संग्रहालयात हलवण्यात आली. त्यानंतर आलेल्या तालिबान राजवटीत काबूलच्या
राष्ट्रीय संग्रहालयाची नासधूस करण्यात आली. या दरम्यान अनेक मूर्ती चोरीला
गेल्या. संग्रहालयातील रजिस्टरमध्ये या मूर्तीची नोंद आहे, परंतु
दुर्दैवाने तालिबान राजवटीनंतर या मूर्तीचा ठावठिकाणा अद्याप लागू शकलेला नाही.
त्यामुळे या मूर्तीच्या छायाचित्रावरच आता समाधान मानावे लागते.
काबूल येथील दुसरी गणेशमूर्तीदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही संगमरवरी मूर्ती
काबूलपासून १० किमी लांब असलेल्या सकरदरा येथे मिळाली होती. या मूर्तीबरोबरच येथे
सूर्य आणि शिवाची मूर्ती आढळून आली होती. ही गणेशाची मूर्ती काबूलमधील शोर बाजार
येथे आणण्यात आली व तेथे ती पुजली जात असे. याही मूर्तीचा ठावठिकाणा सध्या माहीत
नाही. ही गणेशमूर्तीदेखील लंबोदर व उर्ध्विलगी दाखवलेली होती. या गणेशाला सर्पजानवे
घातले असून छाती पिळदार दाखवण्यात आलेली होती. या मूर्तीस चार हात होते. मूर्तीचा
वरचा डावा हात तुटलेला होता, तर खालील दोन्ही
हात शेजारी उभ्या असलेल्या गणांच्या डोक्यावर ठेवलेले होते. या गणांचे कुरळे केस,
कानातील पत्रकुंडले भारतातील गुप्तशैलीचा प्रभाव दाखवतात. या
मूर्तीवर कोणताही शिलालेख नाही. या मूर्तीवर ग्रीक शैलीचा कमी, तर गुप्त शैलीचा जास्त प्रभाव आहे. यावरून ही मूर्ती कदाचित इसवी सनाच्या
चौथ्या शतकातील (कुशाण व गुप्त राजवटींच्या मधल्या काळातील) असावी असा तज्ज्ञांचा
अंदाज आहे. वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे १९८० पर्यंत ही मूर्ती काबूलमधील हिंदुंकडून
मंदिरात पुजली जात होती.
गुप्तकाळानंतर म्हणजे इसवीसनाच्या सहाव्या शतकानंतर गणेशमूर्ती अधिक संख्येने
निर्माण होऊ लागल्या व त्यांच्या प्रकारातही वाढ होऊ लागली. अनेक भुजा असलेल्या
तशाच विविध आसनांत या गणेशमूर्ती निर्माण होऊ लागल्या, त्यामागे या देवतेची वाढणारी लोकप्रियताच होती. नृत्य गणेश,
महागणपती, शक्तिगणेश, पंचविनायक,
हेरंब अशा विविध स्वरूपांत त्याची पूजा होऊ लागली आणि केवळ उत्तर
भारतातच नाही, तर दक्षिण भारतातदेखील गणपती एक लोकप्रिय
देवता ठरला. पंचायतनात गणेशाला स्थान मिळाले, तर इसवीसनाच्या
१५०० वर्षांनंतर या देवतेची लोकप्रियता प्रचंड वाढून गाणपत्य पंथाची निर्मिती झाली
तसेच गणेशपुराण व मुद्गलपुराण या पुराणांची रचना करण्यात आली. अफगाणिस्तानात
काबूल तसेच गार्देज येथे तीन प्राचीन गणेशमूर्ती सापडल्या. या मूर्ती किमान १८०० वर्षे जुन्या असाव्यात असा संशोधकांचा कयास आहे. ज्येष्ठ संशोधक जिओवान्नी
वेरार्दी यांना १९७४ साली काबूल बाजारात संगमरवराची गणेशमूर्ती आढळून आली. ही
मूर्ती नेमकी कुठून काबूलमध्ये आणण्यात आली आणि नंतर त्या मूर्तीचे काय झाले याची
माहिती कुठेही उपलब्ध नाही.
या गणेशमूर्तीची
मूर्तीची उंची २९ सेंटीमीटर होती तर मूर्तीखालील दगडाच्या भागासमवेत ही मूर्ती ३९
सेंटीमीटर उंचीची होती. हा गणेश ललितासनात बसलेला असून त्याला चार हात होते.
मूर्तीची सोंड तुटलेली असून तिच्या उजवीकडील हातात हस्तिदंत दिसतो. मूर्तीच्या
मस्तकावर वैशिष्ट्यपूर्ण असा मुकुट कोरलेला
असून मूर्तीच्या गळ्यात एक साधा हार आहे. मूर्तीच्या शिल्लक राहिलेल्या उजवीकडील
वरच्या हातात परशूचा दंड दिसून येतो तर डावीकडील खालच्या हातात मोदकपात्र दाखवलेले
आहे. मूर्तीच्या तुटलेल्या दोन हातांत पाश आणि अक्षमाला दाखवलेली असावी. याशिवाय
मूर्तीच्या अंगावर सर्पयज्ञोपवीत देखील कोरलेले आहे. या मूर्तीला मागे प्रभावलय
दाखवले असून त्याच्या कडेला असणाऱ्या मण्यांच्या नक्षीखेरीज त्यावर कोणतीही नक्षी
नाही. नेहेमीप्रमाणे गणेशाच्या मूर्तीत आढळते तसे या गणेशाच्या मूर्तीला धोतर
नेसलेले दाखवले नाही तर अफगाणिस्तानातील तत्कालीन वेशभूषेनुसार तो गुढघ्यापर्यंत
असलेला पायजमा असावा असे वेरार्दी यांचे मत आहे. हा पायजमा मूर्तीच्या मागील
बाजूनेही कोरलेला दिसून येतो. प्राचीन इराण, अफगाणिस्तानात असा पायजमा आणि
शिवलेला अर्धा किंवा पूर्ण बाह्यंचा शर्ट घालण्याची पद्धत होती हे तत्कालीन
शिल्पांवरून, चित्रांवरून तसेच नाण्यांवरून दिसून येते. ही
मूर्ती नवव्या शतकातील असावी, असा डॉ. वेरार्दी यांचा अंदाज
आहे. दक्षिण आशियात तसेच
भारताच्या वायव्येकडे जसा भारतीय संस्कृतीचा प्रसार झाला तसाच प्रसार दीड हजार
वर्षांपूर्वीपासून आग्नेय आशियात होऊ लागलेला होता. आग्नेय आशियातील विविध
प्रदेशांतून भारतीय संस्कृती बहरू लागली होती. सध्याच्या म्यानमार, थायलंड,
मलेशिया, लाओस, कंबोडिया,
व्हिएतनाम, इंडोनेशिया आदी देशांतून भारतीय
संस्कृतीचे हे अवशेष आपल्याला त्यांच्या प्रथापरंपरांतून तसेच कला-स्थापत्यातून
दिसतात. या सर्वच देशांमध्ये इतर भारतीय देवदेवतांसोबत गणेशही लोकप्रिय होता.
आजचे व्हिएतनाम, प्राचीन गणेशधाम !
व्हिएतनाम (प्राचीन
नाव चंपा) या देशातील कलास्थापत्याचा अभ्यास एकोणिसाव्या शतकात फ्रेंच संशोधकांनी
मोठ्या प्रमाणावर केला. या देशात झालेल्या उत्खननांत
इसवीसनापूर्वी पाचशे वर्षे ते इसवीसनानंतर दोनशे वर्षे या कालखंडातील स्थानिक
संस्कृतीचे अवशेष आढळले आहेत. यानंतरच्या काळात तेथील स्थानिक ‘चाम’
लोकांचे वर्चस्व होते. इसवीसनाच्या चौथ्या व पाचव्या शतकात येथील
संस्कृतीवर भारतीय संस्कृतीचा प्रभाव पडण्यास मोठ्याप्रमाणावर सुरुवात झाली होती, व्हिएतनाममध्ये
इसवीसनाच्या पाचव्या ते चौदाव्या शतकातील संस्कृत शिलालेख आढळतात. देवळातील
शिलालेख संस्कृतमध्ये तर इतर शिलालेख स्थानिक चाम भाषेत आहेत. व्हिएतनाममध्ये शिवलिंग,
विष्णू, दुर्गा, कार्तिकेय,
गणपती त्याचप्रमाणे बुद्ध, बोधिसत्व यांच्या
प्रतिमा आढळल्या आहेत.व्हिएतनाममधील ‘मी सोन’ (स्थानिक भाषेतील याचा अर्थ सुंदर पर्वत असा होतो) या ठिकाणी इसवी सनाच्या
सातव्या शतकातील शिवालयाचे अवशेष सापडले होते. या शिवालयाच्या आवारातील एका
मंदिरात उंच पीठावर एक उभी गणेशमूर्ती आढळून आली होती. या मूर्तीची उंची ९६ से.मी.
आहे. भारतात आढळणाऱ्या सहाव्या- सातव्या शतकातील गणेशमूर्तीप्रमाणे या मूर्तीच्या
डोक्यावर मुकुट नाही. तसेच या मूर्तीला त्रिनेत्र दाखविले आहेत. या गणेशाच्या
मनगटाला सर्पकंकण व छातीभोवती सर्पबंध दाखवले आहेत. या गणेशाने नागयज्ञोपवीत घातलेले असून त्या
नागाचे शरीर अत्यंत नैसर्गिक दाखवले आहे. मूर्तीचे
इतर हात आता तुटलेले असले तरी १९०३ साली टिपलेल्या या मूर्तीच्या छायाचित्रावरून
मूर्तीच्या इतर हातांत एक मोठा मुळा, परशू व अक्षमाला होती असे दिसून येते.
सध्या या मूर्तीचा मोदकपात्र धरलेला हातच अस्तित्वात असून त्यात मोदकांनी भरलेली
वाटी हाती धरलेली आहे. या गणपतीच्या कमरेला व्याघ्रचर्म गुंडालेले असून त्याखाली
वस्र नेसलेले आहे. एका छोट्या पीठावर ही
मूर्ती उभी आहे. व्हिएतनाम येथे
गणेशाच्या अनेक मूर्ती सापडल्या असून त्या ‘दा नांग’ येथील
संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत.
देश कंबोडियाचा, बाप्पा भारतीयांचा !
व्हिएतनामप्रमाणे
कंबोडिया या देशातही प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. येथे
साधारणत: इसवीसनाच्या पाचव्या शतकापासून भारतीय संस्कृतीचे अवशेष सापडतात.
कंबोडिया येथील अंगकोरवट या प्रसिद्ध मंदिरामुळे येथील भारतीय संस्कृतीचे महत्त्व
विशेष जाणवते. कंबोडियातही हरिहर, शिव, दुर्गा,
विष्णू, गणेश, स्कंद
इत्यादी हिंदू देवतांच्या मूर्ती आढळून
आल्या आहेत. येथील प्राचीन मंदिरांच्या आवारात मंदिर स्थापनेचे शिलालेख सापडतात. लंडनमधील
व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियमच्या संग्रहात कंबोडियातील सर्वात जुन्या
गणेशमूर्तीपकी असलेली एक मूर्ती आढळते. ही मूर्ती इसवीसनाच्या सहाव्या शतकाच्या
अखेरीस किंवा सातव्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडातील असावी. भारतातील
गुप्तकाळातील गणेशमूर्तीप्रमाणे ही अत्यंत साधी दगडी गणेशमूर्ती आहे. या
मूर्तीच्या मस्तकावर मुकुट नाही तसेच अंगावर कोणतेही दागिनेही दाखविलेले नाहीत. या
मूर्तीच्या डाव्या हातात मोदकपात्र दाखविलेले असून गणपतीची सोंड मोदकपात्रावर
दाखवली आहे,
तर या मूर्तीच्या उजव्या हातात मुळा किंवा हस्तिदंत दाखविलेला आहे.
कंबोडियात अंगकोरपूर्व काळातील गणेशमूर्ती कमी आढळतात त्यामुळे त्यापकी ही एक
महत्त्वाची मूर्ती आहे.
न्यूयॉर्क येथील
मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टच्या संग्रहात कंबोडियातील इसवीसनाच्या सातव्या
शतकातील उभी दगडी गणेशमूर्ती आहे या मूर्तीला दोनच हात दाखविलेले असून अंगावर कोणताही दागिना नाही.
तसेच या गणेशाने कंबोडियातील पारंपरिक कटीवस्त्र संपोत नेसलेले दाखवले आहे. कंबोडियातील
दहाव्या शतकातील वालुकाश्मात घडविलेल्या गणेश आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती लॉस एंजलिस
काउंटी म्युझियम ऑफ आर्ट येथील संग्रहात आहेत. या मूर्तीसमूहाच्या डाव्या बाजूला
हत्तीवर गणेश बसलेला दाखवण्यात आला आहे तर उजव्या बाजूला मोरावर कार्तिकेय दाखवण्यात आला आहे. या
मूर्तीसमूहात मध्यभागी सिंहावर बसलेली मूर्ती ही शंकराची असल्याचा तज्ज्ञांचा कयास
आहे. त्यामुळे शंकराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला काíतकेय आणि गणेश
असे या मूर्तीसमूहात दाखवलेले आहे. या तीनही मूर्तीच्या मस्तकावर खमेर
शैलीतील मुकुट दाखविलेले असून कर्णभूषणेही स्पष्ट दिसतात.
कंबोडियातील मंदिरांत
आग्नेय आशियात आढळणाऱ्या बैठ्या गणेशमूर्तीप्रमाणे
मूर्ती दिसून येते. सीएम रिपजवळील अंकोर थोम येथे मिळालेली एक गणेशमूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. कंबोडियातील बायोन शैलीतील ही मूर्ती इसवीसनाच्या
बाराव्या किंवा तेराव्या शतकातील असावी असा संशोधकांचा कयास आहे. ही ८२ से.मी.
उंचीची चतुर्भुज गणेशमूर्ती एका छोट्या पीठावर
पद्मासनात बसलेली असून तिचे पुढचे दोन्ही हात गुढघ्यांवर ठेवलेले आहेत. या गणेशाचे
मागचे दोन्ही हात तुटलेले आहेत. गणेशाच्या डोक्यावर अर्धमुकुट असून त्यातून त्याचा
जटाभार दिसत आहे. या गणेशाच्या गळ्यात यज्ञोपवीत असून त्याच्या दंडावर नागबंध आहे.
कंबोडियातील स्थानिक भाषेत सम्पोत असे वर्णन असलेले चुणीदार कटीवस्त्र परिधान केले
आहे. हे कटीवस्त्र त्याने बयोन शैलीत आढळणाऱ्या छोट्या कंबरपट्टय़ाने बांधले आहे. या गणेशमूर्तीच्या पीठाच्या घडणशैलीवरून
हे शिल्प येथील राजा जयवर्मन सातवा याच्या काळात निर्माण झाले असावे, असा
अंदाज आहे.
कंबोडियाची राजधानी
असलेल्या फ्नोम पेन् येथील राष्ट्रीय संग्रहालयात कंबोडियामध्ये सापडलेल्या विविध
गणेशमूर्ती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.
दक्षिण कंबोडिया येथे सापडलेली सातव्या शतकातील द्विभुज गणेशमूर्ती तसेच एक उभी
असलेली चतुर्भुज गणेशमूर्ती या संग्रहालयात आहे. येथेच एक मोठी व सुंदर अशी
प्रासाद बाक येथील दहाव्या शतकातील मूर्ती, मेबॉन येथील चतुर्भुज गणेशाची
दहाव्या शतकातील मूर्ती, बस्सक येथील अकराव्या शतकातील
मूर्तीदेखील प्रदर्शित केलेल्या आहेत.
शैली थायलंडची, भक्ती गणेशाची !
लॉस एंजलिस काउंटी
म्युझियम ऑफ आर्ट्स यांच्या संग्रहात असलेली थायलंड येथील आठव्या शतकातील तांब्याची
गणेशमूर्ती आगळीवेगळी आहे. ही गणेशमूर्ती
शंकराच्या शेजारी उभी असलेली दाखवलेली असून या गणेशमूर्तीच्या मागील डाव्या हातात
चक्र तर उजव्या हातात शंख दाखवलेला आहे. या मूर्तीच्या पुढील दोन हातांपकी उजव्या
हातात हस्तिदंत दिसून येतो तर डाव्या हातात मोदक
दाखवलेला आहे.
मेट्रोपॉलिटन म्युझियम
ऑफ आर्ट,
न्यूयॉर्कमधील संग्रहात थायलंड येथील सुमारे इसवीसनाच्या पंधराव्या
शतकातील ब्राँझची बैठी (१२ इंच उंचीची)
गणेशमूर्ती आहे. या मूर्तीच्या मस्तकावर मुकुट दाखवलेला असून या मुकुटाला पुढील
आणि मागील बाजूस कदाचित रत्ने जडवलेली होती. या गणेशमूर्तीस नागयज्ञोपवीत दाखवलेले
असून हातात व पायात आभूषणे दाखवलेली आहेत. या गणेशाने उजव्या हातात हस्तिदंत
घेतलेला असून डाव्या हातात अंकुश घेतलेला आहे.
आग्नेय आशियातील या
अनेक देशांतील गणेशमूर्तीचा विचार करता भारतीय संस्कृती आणि धर्माच्या प्रसारामुळे
गणेशाची लोकप्रियता या भागात वाढत गेलेली दिसून येते. आग्नेय आशियातील स्थानिक
कलाकारांनी गणेशाच्या या द्विभुज, चतुर्भुज मूर्ती मूळच्या भारतीय परंपरा
आणि संकेत कायम ठेवून परंतु स्थानिक शैलीत निर्माण केलेल्या आढळून येतात. इतकेच
नाही तर येथील विविध प्रदेशांत व विविध काळात स्वतंत्र शिल्पशैलीही निर्माण झाल्या
होत्या व त्यांचा प्रसार आजूबाजूच्या देशांमध्ये केला गेला, हेही
त्याबरोबर दिसून येते.
रणजितसिंह राजपूत
{ साभार-आभार } या लेखात वापरलेली अनेक छायाचित्रे मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्ट (न्यूयॉर्क), विकिपीडिया), लॉस एंजलिस काउंटी म्युझियम ऑफ आर्ट्स (लॉस एंजेलिस) आणि व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियम (लंडन) यांच्या संग्रहातील असून त्यांच्या आणि google व Pinterest सौजन्याने व सहाय्याने या लेखात साभार वापरण्यात आली आहेत.
संदर्भ :
इंडोनेशियाच्या भूमीत, गणेशाच्या संस्कृतीत !
आग्नेय आशियात ज्या
द्वीपसमूहाला आपण इंडोनेशिया म्हणून ओळखतो. त्यातील जावा व बाली द्वीपांवर आजही भारतीय
संस्कृती जपली गेली आहे. इंडोनेशियाच्या कागदी चलनावरही एका गणेशमूर्तीचे अंकन
केले आहे. जावा व बाली येथे भारतीय संस्कृतीचा प्रभाव इसवीसनाच्या पाचव्या
शतकापासून सुरू झालेला दिसून येतो. येथील मंदिरांमध्ये इंद्र, हरीहर,
शिव, भैरव , ब्रह्मा,
गणेश, महिषासुरमर्दनिी, काíतकेय इत्यादी
देवतांच्या मूर्ती आढळून आल्या आहेत.
इंडोनेशियामध्ये
प्राचीन काळी शंकरानंतर विशेष लोकप्रिय असलेली देवता म्हणजे गणपती. येथे गणेशाची
स्वतंत्र मंदिरे आढळत नाहीत. परंतु प्राचीन शिवमंदिरांमध्ये कोनाड्यात गणेशप्रतिमा आढळतात. काही डच अधिकाऱ्यांना १९३५ साली बोरोबुदूर
भागात बनोन येथे एक विटांचे शिवमंदिर सापडले. इंडोनेशियातील स्थानिक भाषेत
मंदिराला चंडी असे म्हणतात. या चंडी बनोन येथील पाच मूर्ती नंतर जाकार्ता येथील
राष्ट्रीय संग्रहालयात हलविण्यात आल्या. या प्रतिमांमध्ये आठव्या शतकातील एक
गणेशाची सुंदर मूर्ती आहे. जवळपास दीड मीटर उंचीची ही गणेशमूर्ती या संग्रहालयातील
एक प्रमुख आकर्षण आहे.
दगडात कोरलेली ही
गणेशप्रतिमा कमलासनावरबसलेली दाखवण्यात आली आहे. इंडोनेशियात इतरत्र आढळणाऱ्या
चतुर्भुज गणेशमूर्तीप्रमाणेच ही मूर्तीदेखील पायाचे तळवे समोरासमोर ठेवलेली आहे.
मूर्तीच्या मस्तकावर अर्धमुकुट असून त्यातून गणेशाचा जटासंभार दिसत आहेत.
मूर्तीच्या गळ्यात कंठा असून अंगावर नागयज्ञोपवीतदेखील आहे. या एकदंत चतुर्भुज
गणेशाच्या हातांत दात, अक्षमाला, परशु व मोदकाची वाटी
आहे. गणेशाच्या चुणीदार कटीवस्त्रावर फुलांची नक्षी आहे. अत्यंत सुंदर व बारीक
नक्षीकाम या मूर्तीवर करण्यात आलेले आहे. संशोधकांच्या मते इसवीसनाच्या आठव्या ते
दहाव्या शतकात निर्माण झालेली ही मूर्ती म्हणजे इंडोनेशियातील शिल्पकलेचा एक उत्तम
नमुना आहे. कदाचित यामुळेच जाकार्ता येथील राष्ट्रीय संग्रहालयाला भेट
देणाऱ्यांमध्ये ही गणेशाची भव्य मूर्ती लोकप्रिय आहे.गणेशाला इंडोनेशियामध्ये
ज्ञानाचा अधिपती मानत असल्यामुळे बांडुंग येथील तंत्रज्ञान केंद्राच्या चिन्हावरही
ही गणेशप्रतिमा आढळते तसेच इंडोनेशियाच्या २० हजार रुपयांच्या कागदी चलनावरही
गणेशमूर्तीला स्थान मिळाले आहे. इंडोनेशियातील
इसवीसनाच्या नवव्या शतकात निर्माण झालेल्या प्रम्बानन येथील शिवमंदिरात एका
गाभाऱ्यात एक गणेशमूर्ती आहे. इंडोनेशियात आढळणाऱ्या गणेशमूर्तीप्रमाणेच ही मूर्ती
बैठी चतुर्भुज असून
पायाचे दोन्ही तळवे एकमेकांना टेकलेल्या स्थितीत दाखवलेली आहे. याशिवाय येथील बाली
येथे कोरीव ‘गुहा गज’आढळते, या कोरीव गुहेत
एक गणेशाची मूर्ती ठेवलेली असून स्थानिक लोक त्याची पूजा करतात. इडोनेशियाच्या
पूर्वेला असणाऱ्या बोनिओ बेटावरही गणेशाच्या मूर्ती आढळून आल्या आहेत.
हा भारतीय गणेशप्रतिमेच्या प्रवासाचा अतिपूर्वेकडील पुरावा आहे.
अशा या लोकप्रिय देवतेचा, गणेशाचा, उगम आणि प्रवास मूर्ती, नाणकशास्त्रीय व लिखित
पुराव्यातून शोधून काढण्याचा प्रयत्न अनेक तज्ज्ञांनी आजवर केला आहे. हा शोध
अर्थातच इथे थांबत नाही. यातील अनेक दुवे पुन्हा तपासून, नवीन
सापडणारे पुरावे ग्रा धरून ना जाणो उद्या अजून काही आपल्या हाताला लागेल !
रणजितसिंह राजपूत
{ साभार-आभार } या लेखात वापरलेली अनेक छायाचित्रे मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्ट (न्यूयॉर्क), विकिपीडिया), लॉस एंजलिस काउंटी म्युझियम ऑफ आर्ट्स (लॉस एंजेलिस) आणि व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियम (लंडन) यांच्या संग्रहातील असून त्यांच्या आणि google व Pinterest सौजन्याने व सहाय्याने या लेखात साभार वापरण्यात आली आहेत.
संदर्भ :
गणपतीचे मूळ अफगाणीस्थानात, डॉ. आनंद कानिटकर, लोकप्रभा, दि. २ सप्टेंबर २०१६.
आग्नेय आशियातील प्राचीन गणेशमूर्ती, डॉ. आनंद कानिटकर, लोकप्रभा, ३० ऑगस्ट
२०१९
दै. दिव्य मराठी, दि. २ सप्टेंबर २०१९.
दै. लोकसत्ता, लोकरंग, १६ ऑगस्ट २००९.
गणेशोत्सवाची साठ वर्षे, संपादक ज.स. करंदीकर, पुणे, १९५३.
गणेशोत्सव, ना.स.करंदीकर, मराठी विश्वकोश, प्रथमावृत्ती.
ऐतिहासिक माहिती, संदर्भासह आणि पुराव्यासह दिलीय. बाप्पा गणराज आपल्याय ह्या ब्लॉग ला भरपूर यश देईल. जय गजानन जय गणेश.
उत्तर द्याहटवारणजित, अतिशय दुर्मिळ माहिती दिली आहे.संग्रही ठेवावा असा लेख गणेशोत्सवाच्या काळात उपलब्ध करून दिलात.धन्यवाद.श्रीगणेश आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा, पूर्ण करेल यात शंका नाही.
उत्तर द्याहटवा