जाणता अभियंता !

ब्रिटिशांच्या नोकरीतून १९०८ ला स्वेच्छानिवृत्तीनंतर भारतरत्न डॉ. सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या जगतील विविध देशांचा दौरा करून आले. त्यानंतरची त्यांची शाश्वत आणि यशस्वी कामगिरी होती हैदराबादची पूर समस्या. शेकडो अभियंते आणि अनेक संस्था करू शकणार नाहीत अशी ती उत्तुंग कामगिरी होती. हैदराबादला महाविध्वंसक पूर येऊन गेला होता. अर्धे हैदराबाद शहर नष्ट झाले होते, ५० हजार नागरीक मृत्यमुखी पडले होते तर लाखो वाहून गेले होते. प्राणी, पक्षी इतर जीवांची तर मोजदाद नव्हती. आज देशभर वारंवार अतिवृष्टी, महापुरांच्या, धरण फुटण्याच्या घटना घडत असताना शंभर वर्षानंतरही अभियंते आणि अभियांत्रिकी क्षेत्रासाठी ही कामगिरी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक आहे. अभियांत्रिकीच्या क्षेत्रातले म्हणून विश्वेश्वरय्या यांना आपण केवळ १५ सप्टेंबर अभियंता दिनसाजरा करण्यापुरते मर्यादित ठेवू शकत नाही...


आधुनिक भारताचे शिल्पकार ठरवताना आपण काही क्षेत्रांची दखलच घेतलेली नाही. त्यापैकी अभियांत्रिकी हे एक आहे. कारण भारतात अभियांत्रिकीच्या क्षेत्रात जे काही शाश्वत घडलंय ते सारं ब्रिटिशांच्याच माध्यमातून झालंय, असंच काहीसं आमच्या मनावर आजपर्यंत बिंबवले गेलेय. त्यामुळे अस्सल भारतीय मुशितले ‘रियल हिरो’ नेहमीच उपेक्षेच्या अंधारात खितपत पडून आहेत. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचा आवाका आणि व्याप्ती पाहून हे सारे एक व्यक्ती करू शकते, हे वास्तव दंतकथेसारखे अशक्यप्राय वाटू लागते. शेकडो अभियंते आणि अनेक संस्था करू शकणार नाहीत अशी ती उत्तुंग कामगिरी होती.

ज्ञानी माणसाच्या बाबतीत  जगविख्यात तत्वज्ञ कन्फ्युशियस म्हणतो तुम्हाला व्यक्तीचं नावसुद्धा माहीत नसेल, तरीही त्याच्या ज्ञानाचा लाभ जगभर पोहोचू शकतो आणि जगात बदल घडून येतो, तोच खरा युगप्रवर्तक ज्ञानी!ही व्याख्या डॉ. सर विश्वेश्वरयांच्या बाबतीत चपखलपणे लागू पडते. प्रसिद्ध विचारवंत आणि लेखक अतुल देऊळगावकर असे म्हणतात, विसाव्या शतकाच्या आरंभी कलेच्या क्षेत्रात अल्प हेच अधिक आहे (लेस इज मोअर)हा किमानतावाद (मिनिमलीझम.. कुठल्याही बाबीचा कमीत कमी वापर) दिसू लागला होता. १९६० नंतर चित्रकला, संगीत या क्षेत्रांतही किमानतावादी तयार झाले. आपल्याकडे भारतात त्याआधी ७५ वर्षे  म्हणजे १८८५ सालीच विश्वेश्वरय्या किमानतावादवास्तवात उतरवला गेला होता.  विश्वेश्वरय्या (१८६१- १९६२) यांनी पिण्याचे पाणी, सांडपाणी, सिंचन आणि धरण यांची व्यवस्था करताना भांडवल व ऊर्जा यांचा अतिशय किमान वापर व्हावा असा कटाक्ष ठेवला होता. या योजनांची शताब्दी उलटून गेल्यानंतरही त्या उत्तम चालू आहेत, विश्वेश्वरय्यांच्या जन्मशताब्दीप्रसंगी पं. नेहरू म्हणाले होते, विश्वेश्वरय्या हे भारताला पडलेले सुंदर स्वप्न आहे. केवळ विश्वेश्वरय्या यांच्या कर्तृत्वामुळेच देशाची अनेक स्वप्ने साकार झाली आहेत. आपल्या देशातल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी लोकसहभागातून कमी खर्चाच्या किमानतावादाची असलेली गरज पाहता आजही सर विश्वेश्वरय्या हे किती दूरदृष्टीचे द्रष्टे अभियंते, अभिकल्पक, अर्थनीतिज्ञ, नियोजक होते याचा साक्षात्कार होतो. 

केवळ अभियांत्रिकीच्या क्षेत्रातले आहेत असे गृहीत धरून विश्वेश्वरय्या यांना आपण केवळ १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिनसाजरा करण्यापुरते मर्यादित ठेवले आहे. याची प्रचिती वेळोवेळी होते. अभिकल्प ते अंमलबजावणी- सब कुछ ठेकेदारअसा प्रायोजित कार्यक्रम असल्यामुळे अशा दीर्घायू योजनांच्या निर्मात्याला दु:स्वप्न ठरवून त्यांच्या विचारांची उपेक्षा सध्या चालू आहे. आपल्या अधोगतीचा हा नीचांक आहे की अजून काही बाकी आहे, हे पुढे दिसून येईलच.

बंगळुरूजवळील मुद्देनहळ्ळी गावचे पुजारी श्रीनिवास शास्त्री यांचे अकाली निधन झाल्यावर त्यांच्या पत्नी व्यंकटलक्ष्मी या पाच मुले व दोन मुलींना घेऊन भावाकडे वास्तव्यास आल्या. बंगळुरू येथे आल्यावर आपल्या शिक्षणाचा भार मामावर पडू द्यायचा नाही, ही भावना या सर्वच मुलांमध्ये होती. क्रमांक दोनचे चिरंजीव मोक्षगुंडम हे शिकवण्या घेत शिकू लागले. विज्ञान शाखेची पदवी घेतल्यावर म्हैसूर राज्याची शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी पुण्याच्या कॉलेज ऑफ सायन्सेसमध्ये (कालांतराने ते कॉलेज ऑफ इंजिनीअिरगझाले. त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विश्वेश्वरय्या हेच होते.) प्रवेश घेतला. त्यावेळी पुणे हे राष्ट्रीय घडामोडींचे केंद्र होते. न्या. रानडे, टिळक, आगरकर, कर्वे यांच्या व्याख्यानांना ते आवर्जून जात असत. पुढे या सर्व प्रभृतींची भेट घेऊन त्यांनी त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चाही केली. या काळात त्यांनी मराठी शिकून घेतले. पुढे अभियंता झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्यावर खानदेशचा (धुळे)  कार्यभार सोपवला. विश्वेश्वरय्यांच्या कारकिर्दीची मुहूर्तमेढ धुळ्यात झाली. १८८४ ते १९०८ पर्यंत ते मुंबई राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात (पीडब्ल्यूडी) सहाय्यक इंजिनीअर होते. तेव्हा तब्बल १६ महिने विश्वेश्वरय्या धुळ्यात  होते.

पीडब्ल्यूडीच्या जुन्या कार्यालयातील एका खोलीत ते बसत. ( जेथे आज त्यांचे सुसज्ज असे स्मारक आहे.) विश्वेश्वरय्या यांच्यासमोर धुळे शहरासाठी १६ किलोमीटर अंतरावरून पाणीपुरवठा करण्याचे पहिले आव्हान आले. त्यांनी जलवाहिन्या आखून वानलिका (सायफन) तत्त्वाने पाणी आणण्याचे ठरवले. त्या काळातही बांधकाम यंत्रणेत साचेबद्ध चाकरी करणारे कर्मचारी व ठेकेदार होतेच. नियमानुसार जाणारे व अहंगंडाने उन्मत्त झालेले ब्रिटिश अधिकारीही होते. अशा मानवी व इतर तांत्रिक अडचणींवर मात करून त्यांनी ही योजना वेळेआधीच पूर्ण केली. हे पाहून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी आलेल्या ब्रिटीश अधिकाऱ्यानेसुद्धा त्यांची प्रशंसा करून त्यांना बढती दिली. डेडरगाव तलाव ते धुळे शहर पाइपलाइन, दातर्ती येथील सायफन्स, पांझरा नदीवरील १८८ फड बंधारे ही धुळ्यातील त्यांची मुख्य कामे. (महाराष्ट्रात त्यांचे २८ वर्षे वास्तव्य होते.) त्यानंतर त्यांनी सक्कर (सिंध), सूरत, पुणे व कोल्हापूर येथील पाणी योजनांची आखणी व अंमलबजावणी केली. नदीच्या पात्रात काठाजवळच छतासह (स्लॅब) विहीर बांधायची. २० फूट खोलीवर विहिरीला बारीक छिद्रे (वीप होल्स) पाडल्यामुळे नदीचे पाणी गाळून थेंबाच्या रूपाने विहिरीत येते. या विहिरीतील पाणी पंपाने टेकडीवरील पाण्याच्या टाकीत पोहोचवायचे आणि तिथून शहराला पाणी पुरवायचे. विश्वेश्वरय्यांनी अशी योजना सक्कर येथील सिंधू नदीवर प्रथम केली. तेव्हापासून भरण विहीर (जॅक वेल) ही पद्धत रूढ झाली.

विश्वेश्वरय्या १८९५ साली पुण्यामध्ये आले तेव्हा शेतकऱ्यांच्या मनात पाणीवाटपाबाबतीतला असंतोष शिगेला पोहोचला होता. हे ओळखून त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात सभाच ठेवली. शेतकऱ्यांचा संताप ऐकून त्यांनी पाणीपुरवठ्यासंबंधीची आकडेवारी सादर करत सगळा प्रश्न वाटपात असल्याचे स्पष्ट केले. ‘‘खानदेशात पाणीवाटपासाठी फड पद्धत असून शेतकरीच पाटकरी नेमतात. चक्रीय पद्धतीने पिके घेतली जातात. दुष्काळी भाग असूनही प्रत्येकाच्या वाट्याला ऊस, कापूस, डाळी, भाजीपाला व कडधान्ये आल्यामुळे सगळे शेतकरी संपन्न झाले. दररोज सरकार व अधिकाऱ्यांच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा पाणीवाटपाची जबाबदारी उचला,’’ असे खडे बोल त्यांनी सुनावले. तसेच १९०१ साली भारताच्या पहिल्या सिंचन आयोगासमोर पाणीवाटपासाठी सर्वाना समान न्याय देणारी ब्लॉक पद्धतलागू करून सुबत्ता समाजाच्या सर्व स्तरांत पोहोचविण्याचा आग्रह धरला. इतकेच नाही, तर त्यांनी नीरा नदीवर ही पाणीवाटप पद्धत यशस्वीही करून दाखवली. १९०८ च्या मुंबई गॅझेटियरमधील नोंदींत नीरा कालव्यावरील ब्लॉक पद्धत राबवून शेतकऱ्यांचे उत्पन्न व सरकारचा महसूल वाढला. याचे श्रेय बुद्धिमान, कार्यक्षम आणि दक्ष अधिकारी विश्वेश्वरय्या यांना जाते,’ अशी माहिती नमूद केली आहे. त्यांनी कुकडी, मुठा, प्रवरा व गोदावरी येथे ब्लॉक पद्धत करण्याच्या योजना केल्या. धरणात पूर येताच पाण्याच्या दाबाने दरवाजे आपोआप उघडतील आणि पूर ओसरताच पुन्हा मानवी हस्तक्षेपाशिवाय पूर्ववत होतील असा कल्पक अभिकल्प विश्वेश्वरय्या यांनीच जगाला दिला. त्यांनी पुण्यासाठी खडकवासला धरण बांधून त्यावर सरकणारे स्वयंचलित दरवाजे (ऑटोमॅटिक गेट्स) बसवले आणि मित्रांच्या आग्रहामुळे त्याचे पेटंट प्राप्त केले. धरणात एका विशिष्ट पातळीच्यावर पाण्याचा साठा गेल्यावर, दरवाजे आपोआप उघडले जातात आणि पाणी कमी झाल्यावर मानवी किरकोळ तांत्रिक बदल सोडले तर आपण आजही त्याच डिझाइनची गेट्स बनवितो.

करिअरच्या मध्यात नोकरी सोडून किंवा रजा घेऊन, नवीन काही शिकण्याची धाडसी सुरुवातही विश्वेश्वरय्या यांनीच सुरु केली. १९०८ साली, वयाच्या ४७ व्या वर्षी सरकारी वरिष्ठ पदाच्या (अधीक्षक अभियंता) नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. कामातून नाही. उलट नंतर त्यांची कारकीर्द जास्त बहरली. एक वर्ष परदेशात राहून त्यांनी अभियांत्रिकीचं नवीन ज्ञान आत्मसात केलं. हा नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याचा त्यांचा उत्साह नंतरही कायम राहिला. आवडीचा विषय होता कारखाने, स्टीलपासून मोटारगाड्यांपर्यंत आणि रेशीमपासून साबणापर्यंत. देश होते खासकरून युरोप, अमेरिका, कॅनडा व रशिया. हे उच्चशिक्षण संपवून आल्यावरची त्यांची पहिली कामगिरी होती हैदराबादची पूर समस्या. हैदराबादला महाविध्वंसक पूर येऊन गेला होता.  वर्तमान परिस्थितीत देशात, राज्यात सर्वत्र महापूर आणि धरण फुटण्याच्या घटना पाहता, ही कामगिरी आज शंभर वर्षानंतरही अभियंते आणि अभियांत्रिकी क्षेत्रासाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक आहे. २८ सप्टेंबर १९०८ मध्ये, बरोबर ११० वर्षांपूर्वी  हैदराबाद शहरात, मुसी नदीला असाच भयानक पूर आला होता. जवळपास ५० हजार नागरिक मृत्युमुखी पडले तर लाखो बेघर झाले होते. निम्म्याहून अधिक शहर नष्ट झालं. मुसीला येणारा पूर आणि त्यामुळे होणारं नुकसान, हैदराबादला नवीन नव्हतं. पण हे संकट न भूतो न भविष्यती असं होतं. पूर निवारण झाल्यावर, सहावा निजाम मेहबूब अली खान याने ब्रिटिश रेसिडेंटचा, इंग्रज इंजिनीअर सल्लागार म्हणून नेमण्याचा आग्रह डावलून विश्वेश्वरय्या यांना पाचारण केलं. त्यांना मुख्य अभियंता हे पद बहाल केले. या पूर समस्येवर कायमचा तोडगा काढण्यासाठी.

तत्कालीन मुंबई आणि मद्रास प्रांताच्या मागील कित्येक वर्षांच्या पावसाच्या सरासरीचा त्यांनी अभ्यास केला.  हैदराबाद प्रांताच्या नद्या, ओढे आणि नाले यांची पाहणी केली. आणि मगच मूळ प्रश्नाला हात घातला. त्यांनी संरचना आणि नियोजन करून दिलेल्या उस्मानसागर आणि हिमायतसागर या धरणसदृश जलाशयांमुळे आजतागायत  हैदराबादला परत तसा पूर आलेला नाही. पुन्हा असा कधी पूर आला तर सुरक्षित जागी जाता यावं म्हणून, हैदराबादजवळ नवीन शहर नियोजन करून वसवण्यात आलं. आज आपण त्याला सिकंदराबाद म्हणून ओळखतो. आजही  शेकडो अभियंते आणि अनेक संस्था करू शकणार नाहीत अशी ती उत्तुंग कामगिरी भारतरत्न विश्वेश्वरय्यांनी त्यावेळी केली होती.

विश्वेश्वरय्या यांची ही ख्याती ऐकून कोल्हापूरच्या महाराजांनी मातीचे धरण फुटण्याचा धोका टाळण्याकरता त्यांना पाचारण केले. त्यांनी धरण भरताच पाणी निघून जाण्याची व्यवस्था सुचवली. तीन वर्षांनंतर राधानगरी धरण बांधून दिले. काही कालावधीत त्यांनी धारवाड, विजापूर या शहरांसाठी पाणीपुरवठा योजना केल्या. मुंबई नगरविकासासाठी आराखडा तयार करून त्यानुसार अडथळे काढून टाकले. पूरनियंत्रण, मलनि:सारण व सांडपाणी व्यवस्थापन ही आव्हाने त्यांनी लीलया पेलून दाखवली.  हैदराबाद, इंदूर, बंगळुरू, म्हैसूर, बेळगाव व मुंबई (नवी अंधेरी) या शहरांची रचना व विस्तार यासाठी त्यांनी आराखडा तयार करून दिला.

म्हैसूरच्या महाराजांनी १९०९ साली विश्वेश्वरय्या यांना मुख्य अभियंता होण्याची विनंती केली. त्यावर विश्वेश्वरय्या यांनी लिहिले होते, देशाच्या विकासाकरिता पायाभूत सेवा, तंत्रशिक्षण व उद्योग चालू करणे आवश्यक आहे, हे मला माझ्या विदेश दौऱ्यातून लक्षात आले आहे. आपल्याला अशी इच्छा आहे काय? माझे नकाशे, योजना व अंदाजपत्रके युरोपीय अधिकाऱ्याला दाखवू नयेत. काम चालू असताना समिती नेमून अडथळा आणू नये. मी राज्याच्या भल्यासाठीच काम करीन यावर पूर्ण विश्वास ठेवावा. शंका असल्यास थेट मला विचारावे.विश्वेश्वरय्या यांनी घातलेल्या या अटी मंजूर झाल्यावर ते तिथे रुजू झाले. १९१९ साली निवृत्त होताना ते म्हैसूरचे दिवाण (प्रशासक) होते. या काळात ३०० किलोमीटर रेल्वेमार्ग तयार झाले. पायाभूत सेवा द्या, विकास आपोआप होईल! हे त्यांचे ब्रीद होते. त्यानुसार त्यांनी म्हैसूर राज्याला तयार केले. भटकळ बंदर विकसित करण्याच्या त्यांच्या संकल्पनेला इतर अधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. परंतु भारत सरकारच्या कमिशनने कोलार व भद्रावती येथील उद्योगांना नवी चालना मिळेलअसा निर्वाळा दिल्यानंतर मार्ग सुकर झाला. १९११ ते १९३१ या २० वर्षांत त्यांनी कृष्णराजसागर धरण प्रकल्प पूर्णत्वास नेला. कावेरी नदीवरील ८६०० फूट लांब, १४० फूट उंचीचे, २.४३ कोटी रुपये खर्च आलेले हे धरण त्या काळातले भारतातील सर्वात मोठे व पूर्णत: भारतीय अभियंत्यांनी अभिकल्पित केलेले धरण होते. धरणासाठी लागलेल्या १६१ दरवाजांपकी १३१ भद्रावतीला तयार करण्यात आले, तर केवळ ३० आयात केले होते.

म्हैसूरचे दिवाण झाल्यानंतर इंग्रजीतून सादर होणारे अंदाजपत्रक स्थानिक कन्नड भाषेत चालू केले. स्थानिक स्वराज्य संस्था बळकट केल्या. प्रशासनातील अधिकाऱ्यांसाठी आचारसंहिता लिहून ती सर्वाना वाटली. अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या व अधिकार यांची स्पष्ट कल्पना दिली. दर तीन महिन्यांनी कार्यक्षमता तपासणी अहवालतयार करवून घेतला. त्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण केला. सर्वाना सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण सुरू केले. तसेच मुलींच्या शिक्षणाला विशेष उत्तेजन दिले. शाळा व वाचनालये काढण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्याच पुढाकारामुळे १९१६ साली म्हैसूर विद्यापीठाची स्थापना झाली. तर १९१९ साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसच्या स्थापनेसाठी ४०० एकर जागा त्यांनी दिली. बंद पडू लागलेल्या भद्रावती आयर्न अॅ्ण्ड स्टील इंडस्ट्रीला पुनरुज्जीवित केले. ग्रामीण भागात छोटे व मोठे उद्योग चालू व्हावेत यासाठी त्यांनी दुग्ध व्यवसाय, मधमाशीपालन, कोंबडीपालन, रेशीम उत्पादन, लाकडी खेळणी, चंदनापासून तेल व साबणाचे (दिवाळीला हमखास ज्याची आठवण येते असा म्हैसूर सँडल सोप) उत्पादन या व्यवसायांना चालना दिली. हे उद्योग आजही त्यांची छाप (ब्रँड) टिकवून आहेत. तरुणांचे कौशल्य व नपुण्य विकसित करण्यासाठी शेतकी तसेच तंत्रशिक्षण शाळाही त्यांनी चालू केली. उद्योगांना अर्थसाहाय्य करण्याकरिता बँक ऑफ म्हैसूरसुरू केली.

कार्मायोगातून किंवाआचरणातून व्यक्त करणारे विश्वेश्वरय्या हे शब्दांतून कधीही व्यक्त होत नसत. शिस्तप्रिय, कर्तव्यकठोर, मितभाषी, स्तुती व निंदा दोन्ही मनावर न घेणारे कमालीचे संयमी, कितीही कटू प्रसंगात शांत व नम्रपणे आपली मते स्पष्टपणे मांडणारे असे अतिशय  विरळे व्यक्तिमत्व होते. विश्वेश्वरय्या यांच्या घरातील वातावरण अतिशय धार्मिक असूनही ते निरीश्वरवादी होते. ते कधीही देवळात गेले नाहीत, धार्मिक उत्सवांत सहभागी झाले नाहीत किंवा कुठल्याही कार्यारंभी त्यांनी देवाला नमस्कार केला नाही. समस्त भारतीयांशी तुच्छतेने वागणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनाही त्यांचा धाक वाटत असे. तर ब्रिटिश अभियंत्यांना त्यांच्या कर्तृत्वाविषयी विलक्षण आदर होता. त्यामुळेच १९१३ साली ब्रिटनच्या राणीने सर’(नाइटहूड) हा बहुमान त्यांना बहाल केला होता.

गंगा नदीचे संपूर्ण खोरे हा गाळाचा प्रदेश आहे. शेकडो फूट खोल गेले तरीही पक्का खडक लागत नाही. त्यामुळे वाराणसीपासून कोलकात्यापर्यंत गंगेवर पूलच नव्हता. देश स्वतंत्र झाल्यावर बिहार व बंगाल राज्यातून पुलाची मागणी जोर धरू लागली. तेव्हा १९५२ साली, ९२ वर्षांच्या विश्वेश्वरय्यांनी कार, हेलिकॉप्टर, विमान यांतून प्रदीर्घ पाहणी केली. केवळ एकच पूल बांधणे पुरेसे नाही. मात्र, शासनाला एकच बांधायचा असेल तर मोकामेह ही जागा सगळ्यात योग्य आहे. बंगालच्या फराक्का येथे रेल्वे व रस्ता यांसाठी संयुक्त पूल बांधावा. पाटणा येथे पूल महागडा ठरणार आहे. गंगेच्या पात्राखालून बोगदा करून वाहतुकीला पर्याय द्यावा,’ असा सल्ला त्यांनी दिला. त्यानुसार पूल निर्माण केले गेले. एरवी स्वदेशीचा आग्रह धरणाऱ्या विश्वेश्वरय्या यांना भारतीय पोलाद व सिमेंट यांच्या गुणवत्तेविषयी कल्पना असल्यामुळे जगातील उत्तम विदेशी कंपनीकडून पूल बांधावेतहे त्यांनी स्पष्ट केले होते. असा कामाचा प्रचंड व्याप असतानाही विश्वेश्वरय्या यांनी तब्बल २८ पुस्तके लिहिली. रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया’, ‘नेशन बिल्डिंग’, ‘प्लॅन्ड इकॉनॉमी ऑफ इंडियाया शीर्षकांवरूनच त्यांच्या पुस्तकांची सधनता लक्षात येते. त्यांचे बिल्डिंग ऑफ मॉडर्न इंडिया हे पुस्तक प्रसिद्ध झाले तेव्हा त्यांचे वय होते ९६ वर्षे! विश्वेश्वरय्या यांनी जी काही पुस्तके लिहिली त्यातील १९३५ च्या सुमारास प्रकाशित झालेले प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडियाहे जास्त गाजलेलं पुस्तक. तोपर्यंत महालनोबीस सारखे संख्याशास्त्रज्ञ सोडले तर कोणीही संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचा इतका सखोल विचार मांडला नव्हता. सकल राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी या विषयाचा त्यांनी केलेला ऊहापोह मुळातून वाचण्याजोगा. शेतीच्या विकासातील महत्त्वाचे अडथळे त्यांनी विषद केले आहेत.

एकत्र कुटुंबात वाटण्या झाल्यामुळे कमी कमी होणारे प्रति माणसी शेतीचे क्षेत्रशेती करण्याच्या पारंपरिक व जुनाट अशास्त्रीय पद्धती .

शेणाचा चुकीचा वापर (उदाहरणार्थ खत करून उपयुक्तता वाढविण्याऐवजीगवऱ्या करून जाळण्यासाठी).

स्त्री शक्तीचा तथाकथित सामाजिक बंधनामुळे अपुरा वापर. ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा.


अगदी आजही शेतीसंबंधात वरील प्रश्न बहुतांशी कायम आहेत. इतकंच काय अजून जटिल झालेले आहेत. त्यामुळे औद्योगिक अर्थव्यवस्था सुधारली की शेतीवरील अनाठायी अवलंबित्व आपोआप कमी होईल हा सिद्धांत आज ८४ वर्षांनीदेखील तंतोतंत लागू आहे. सरकारच्या निव्वळ उत्पन्नातला शेतीचा वाटा कमीत कमी व कारखानदारीचा वाटा जास्तीत जास्त असावा हा त्यांचा कायमचा आग्रह असे.

विश्वेश्वरय्या हे गांधीजींपेक्षा आठ वर्षांनी मोठे होते. त्या दोघांची प्रत्यक्ष भेट एकदाच झाली असली तरी दोघांमध्ये प्रदीर्घ पत्रव्यवहार झाला होता. दोघांत मतभेद असूनही एकमेकांविषयी अपार आदर होता. मोठ्या उद्योगांना गांधीजींचा विरोध जाहीरच होता. तर विश्वेश्वरय्या यांना देशाला स्वावलंबी करण्याकरिता ते अटळ वाटत होते. गांधीजींनी विश्वेश्वरय्या यांना उत्तरादाखल पत्रात लिहिले, ‘आपण अवजड उद्योगाविषयी आपली मते स्पष्टपणे लिहिली आहेत. ती मान्य करायला मला कोणतीच अडचण दिसत नाही. मोठी यंत्रे जेव्हा मानवी काम हिसकावून घेतात आणि त्यांना पर्यायी काम उपलब्ध करून देत नाहीत, तेव्हा माझा विरोध चालू होतो.१९३७ साली ओरिसात महापूर आल्यावर गांधीजींनी त्यांना पत्र पाठवले, ‘पुराच्या थैमानाविषयी आपण वाचले असेलच. मी ओरिसाचे मुख्यमंत्री विश्वनाथ दास यांना आपल्याशी संपर्क साधून आपले मार्गदर्शन घेण्यास सांगितले आहे. आपल्याला जे जे करता येणे शक्य आहे ते ते आपण करालच याची खात्री आहे.या पत्रानंतर विश्वेश्वरय्या यांनी तिथे जाऊन तपशीलवार पाहणी केली आणि हिराकुडला धरण बांधण्याची सूचना केली.

आज अत्यंत लहान पुरस्कारासाठीही कथित बड्या व्यक्तींच्या समोर लाचारी बघताना विश्वेश्वरय्यांच्या भारतरत्नचा किस्सा दीपस्तंभ ठरावा. १९५५ मध्ये भारतरत्नस्वीकारण्याविषयीचे पत्र त्यांना मिळाले. उत्तर देताना ९५ वर्षांचे विश्वेश्वरय्या पंतप्रधान नेहरूंना लिहितात, तुम्ही मला भारतरत्नहा देशाचा सर्वोच्च किताब देऊ करत आहात. मात्र मी एक गोष्ट स्पष्टपणे नोंदवून ठेवतो, अशी पदवी दिल्यावर आपल्या सरकारने केलेल्या कामाची मी स्तुतीच करीन अशी तुमची अपेक्षा असेल तर मी तसे करणार नाही. अयोग्य कामावर मी टीका करणारच. हे तुम्हाला मान्य असेल तर आणि तरच मला पदवी द्या.नेहरूंनाही हे परखड मत फारच आवडले, उलट टपाली पंडितजींनी कळविलं, ‘‘भारतरत्न  हा आपल्या देशाचा किताब आहे. सरकारचा नव्हे. सन्मान स्वीकारल्याने तुम्ही सरकारचे मिंधे होण्याचं काहीही कारण नाही.’’ भारतीयांचा हा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा अपवाद वगळता एकाही अभियंत्याला आजतागायत  मिळालेला नाही.

कामानेच काय, पण अति कामानेदेखील कोणी मरत नाही असा गाढ विश्वास असणाऱ्या विश्वेश्वरय्या यांना प्रचंड काम करण्यासाठी पुरेपूर १०१ वर्षांचे निरोगी आयुष्य लाभले. या माणसाने कधीच आपल्या संस्कृतीचे गोडवे गायले नाहीत. उलट शक्य त्या व्यासपीठावरून संस्कृतीच्या अवास्तव स्तोमामुळे, आपण अंधश्रद्धाळू आणि परंपरावादी बनलो त्यामुळे  आर्थिकददृष्ट्या आपण कसे मागासलेले राहिलो, हे समजावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. केवळ अभियंतेच  नाही तर सर्वसामान्यांनाही प्रेरणा मिळेल असे अफाट कार्य भारतरत्न सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांनी करून ठेवले आहे.

डॉ. मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या हे उत्तुंग पर्वतशिखरांएवढे उंच होते, अशी इतिहासाने नोंद करून ठेवली आहे. इतिहास असेही म्हणतो, की एखाद्या व्यक्तीची महानता ही त्याने किती संपत्ती कमावली किंवा किती सत्ता उपभोगली यावर ठरत नाही. त्या व्यक्तीने मानवाच्या हितासाठी काय योगदान दिले यावर ती ठरते; आणि ह्या कसोटीवर तपासून पाहायचे ठरवले, तर विश्वेश्वरय्या अधिकच उंच भासू लागतात. ते एक महान अभियंता होते, उत्तम प्रशासक होते, एक उद्योगपती होते, एक शिक्षणतज्ञ होते, अर्थतज्ञ होते, समाजसेवक, क्रीडाप्रेमी , लेखक आणि द्रष्टे महापुरुष होते. सक्तीचे प्राथमिक शिक्षण आणि गरीबांना पददलितांना मोफत शिक्षण हे धोरण भारतात प्रथम त्यांनी आणले. मोठे उद्योग, त्यासाठी पैसा हवा म्हणून राज्याची स्वतःची बँक, कुशल मनुष्यबळ लागेल म्हणून शिक्षण व तंत्रशिक्षण संस्था, ग्रामीण कृषिप्रधान जीवन सुखी व्हावे म्हणून शेतकी शाळा व तंत्रशिक्षण संस्था, कॉलेज, शिक्षण आपल्या गरजेनुसार देता यावे म्हणून आपले विद्यापीठ; असे अनेक उपक्रम त्यांनी राबवले. पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या. राष्ट्राच्या  विकासासाठी पंचवार्षिक योजना  ही कल्पना लिखित स्वरूपात मांडली. म्हणून ते काळाच्या पुढे पाहणारे विचारवंत ! द्रष्टे ! सतत कठोर परिश्रम, शिस्त काम आणि त्यावरचे प्रेम यातून किती मोठा पल्ला गाठता येतो, हे दर्शवणारे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या !

रणजितसिंह राजपूत


टिप्पण्या

  1. खरोखर उत्तम, आपण खूप चांगली ओळख करून दिली आहे या लेखातून.सबकुछ ठेकेदार, प्रचंड खर्चाचे प्रकल्प आणि सर विश्वेश्वरय्या यांची देशभक्तिपूर्ण विचारसरणी, कृती..... लेखातील दोन ओळींच्या मध्ये बरंच काही सांगितले आहे अस्पन. विचारशक्तीला चालना दिल्याबद्दल धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

©️
आपल्या मौलिक प्रतिक्रियांचे स्वागतच आहे. पोस्ट आवडल्यास कृपया शेअर करायला विसरू नका. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करू नये. संदर्भ म्हणून वापर करताना ब्लॉग व लेखकाचा उल्लेख जरूर करावा.

लोकप्रिय पोस्ट