ॠतू हिरवा अन् शेंडीवाला रेडवा !
डोंगराच्या पायथ्याशी हिरव्या रानावनात राहणारा
इंद्रधनु सौंदर्याचा शेंडीवाला रेडवा पक्षी त्याच्या कुटुंबासह निरीक्षण
करायला मिळणे हे या हिरव्या हिरव्या श्रावणी अरण्यातील भटकंतीचं यशच म्हणावे
लागेल. श्रावण म्हणजे भक्ती आणि पूजेचा महिना. शहरात, गावात, डोंगरदऱ्यात असलेल्या शंकराच्या पूजेत जनता गुंग झालेली असते. मी मात्र
रानावनातील हिरव्या सौंदर्यात सजीवसृष्टीच्या शोधात भटकत असतो. कारण माझा परमेश्वर
येथील अरण्यरूपी स्वर्गात आहे. तो मला नेहमीच भरभरून देत असतो. ते असतं हिरव्या
रानाचं देणं दुर्मिळ अशा शेंडीवाला रेडवा पक्ष्याच्या शोधाच्या रूपानं...
शेंडीवाला रेडवा ➧छायाचित्र: छत्रपती धुमटकर |
अकोट-पोपटखेडनंतर खटकाली वनचौकी ओलांडून सातपुड्याच्या दक्षिण मेळघाटमध्ये प्रवेश केला. दोन्ही बाजूंनी डांबरी रस्त्याच्या काठापासून पर्वतराजीच्या शिरापर्यंत हिरवाकंच शालू पांघरला होता. दूरदूपर्यंत हिरव्यागर्द तृणमेळ्यातून रानवाटेवरचा प्रवास आनंददायी वाटत होता. दोन-तीन फुटांच्या गवतात दोन्ही बाजूंना कळलावी, रानहळद, रानपराटी, रानझेनिया, रानतिवडी फुलांच्या पायघड्या पडल्या होत्या. या रानफुलांनी रानवाटेला ऋतुसाज चढविला होता. चोहिकडे वृक्षलता एकमेकांच्या हातात हात घालून अंगावर श्रावणधारा झेलत होत्या. हिरव्या-हिरव्या रानातून वाहणारे नदी-नाले भरभरून वाहत होते. दगडधोंडय़ांवरून उतरणारे शुभ्र फेसाळ पाणी रानाला साद घालत होते.
दोन्ही बाजूंना उंच उंच हिरव्या पानांनी लदबदलेल्या साग वृक्षांनी पर्वतराजीतील नागमोडी रस्त्यांवर छत्रछाया धरली होती. उन-सावलीच्या लपाछपीत श्रावणी उन्हाचे कवडसे त्यातून या रानवाटांवर उतरत होते. मेळघाटच्या अरण्य सागरातील प्रत्येक साग वृक्ष पांढऱ्या मोतीदार फुलांच्या पिंजारलेल्या ढगांनी झाकला होता. रानवाऱ्यामुळे नभात जशी ढगांची धावपळ दिसते तसेच दृश्य या समृद्ध वनसृष्टीत पाहायला मिळत होते. काही ठिकाणी डोंगरशिळांना पाझर फुटला होता. अशा वेळी दरडी कोसळण्याच्या घटना या भागात घडत असतात. काही ठिकाणी आम्हाला ते अनुभवायला येत होते. परंतु वर्षांऋतूतील जंगल भटकंती हा प्रमुख उद्देश असल्यामुळे अशा घटनांकडे दुर्लक्ष केले जाते.
दोन्ही बाजूंना उंच उंच हिरव्या पानांनी लदबदलेल्या साग वृक्षांनी पर्वतराजीतील नागमोडी रस्त्यांवर छत्रछाया धरली होती ➧छायाचित्र: छत्रपती धुमटकर |
आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या
शेतातील पिकं कंबरेपर्यंत आली होती. काळ्या आईने हिरवे वस्त्र परिधान केले होते.
पाखरांची हालचाल वाढली होती. या काळात बहुतेक पाखरांची पिल्लं घरट्यात दिवसेंदिवस
मोठमोठी होऊ लागतात. त्यांना त्यांचे माय-बाप भरपूर अन्न खाऊ घालतात. त्यांची ही
धावपळ दुरूनच लक्ष वेधून घेते. शेतातील पिकांची पशूपक्ष्यांनी जास्त नासधूस करू
नये म्हणून डोंगरपायथ्याच्या शेताशेतामधील उंच भागात मचाणवर आदिवासी स्त्री उभे
राहून गोफणद्वारे किंवा मोठय़ाने आवाज करत पाखरांना पिटाळून लावतांना दिसत होती.
अशाच एका शेताजवळ सूर्यफुलांचे छायाचित्र घेण्यासाठी थांबलो. अथक प्रयत्नाने गवती
झुडपं कशीबशी ओलांडून मी व धुमटकर सूर्यफुलाच्या शेतात पोहोचलो. हिरवे-हिरवे शेत
हिरव्या पर्वतरांगांपर्यंत पसरले होते. सूर्यफुलांवर सांजवेळेची उन्हे उतरली
असल्यामुळे ते अधिकच खुलून दिसत होतं. दोघांनीही सूर्यफुलाची वेगवेगळ्या कोनातून
छायाचित्र घेण्याचा सपाटा लावला. मन शांत होतच नव्हतं. सूर्यप्रकाशावर वाढ
होणाऱ्या सूर्यफुलांमध्ये सूर्याचे रूप पाहायला मिळते. हिरव्या हिरव्या शेतात ही
सूर्यफुलाची झाडं पाहिली म्हणजे सूर्याने पृथ्वीवर पाठविलेले त्याचे सगेसोयरेच
वाटतात. आपल्या आकाशगंगेत ग्रह-तारे जशी सूर्याभोवती फिरत असतात तसे कीडे-कीटक, फुलपाखरं,
पक्षी या सूर्यफुलांभोवती पिंगा घालताना दिसत होती.
सूर्यफूल हेही सजीवसृष्टीचं एक रहस्यच आहे. एवढ्यात रोडवर उभ्या असलेल्या प्रदीप
हिरुरकर
या रानसख्याने त्वरित परत येण्यासाठी रानशीळ घातली. छायाचित्र घेण्यात मग्न झालेले
आम्ही दोघेही धावपळ करत गवतीवेली आणि झुडपांवर सावधपणे पाय देत देत रस्त्यावर आलो
तो काय आश्चर्य?
शेताच्या काठावरच्या पाषाणजवळ
गवती झुडपांमध्ये गवताच्या पात्यापात्याने विणलेले वाटीसारखे घरटे होते. त्यात
होती दोन इवलीशी पिल्लं. ती चोची उघडून मायबाप येण्याची वाट पाहत होती. पिल्लं
कसली ती होती दोन-तीन दिवसांचे मांसाचे गोळेच. एवढ्यात कबऱ्या रंगाची ठिपक्या रंगाची मादी चोचीत त्यांच्यासाठी
भक्ष्य घेऊन आली. घरट्यात ती जाताच पिल्लांची हालचाल वाढली. दोन्ही पिल्लं
आपआपल्या परीनं चोची वर करून आईला ‘पहिले माझ्या चोचीत, पहिले माझ्या चोचीत’ असे सांगत होते. मोठ्या पिल्लाची चोच जास्त ‘आ’ केलेली होती.
आईने अन्न भरविले आणि परत तिने अन्न आणण्यासाठी भरारी मारली. मागोमाग चिमणीएवढ्या आकाराचा काळ्या-तांबूस रंगाचा डोक्यावर सुंदर काळा तुरा असलेला पिल्लांचा बाप
चोचीत अन्न घेऊन आला नि घरट्यात जाऊन आपल्या पिल्लांना भरवू
लागला. परत तो गेला की मादी अन्न घेऊन यायची. एकसारखा त्यांचा उपक्रम सुरू होता.
मी घरट्यापासून पाच-सात फूट अंतरावरून पाहिजे तशी छायाचित्रे
श्वास रोखून काढत होतो. आमच्यापासून काही धोका नाही हे त्यांना समजल्याने दोघेही
नर-मादी बिनधास्त आळीपाळीने चोचीत अन्न घेऊन यायचे. पिल्लांना भरवायचे आणि परत
जायचे. घरटे, त्यातील पिल्लं, त्यांचे माय-बाप या सर्वाची
छायाचित्रं घेऊन थोडा थकवा जाणवत होता. त्यामुळे रस्त्यावर येऊन एक मोकळा श्वास
सोडला. दोन घोट पाणी घशात ओतले आणि शांत झालो. घरट्यातील ही दोन बाळं (पिल्लं)
होती शेंडीवाली रेडवा (Crested Bunting) या
दुर्मिळ अशा सुंदर पक्ष्याची. दोन-अडीच दशकांच्या अरण्य भटकंतीत ती मला आज प्रथमच
अनुभवायला मिळाली होती. त्यांचे निरीक्षण करता आले होते. त्यांची वेगवेगळी छायाचित्रे
मिळविता आली होती. याचे सर्व श्रेय मी माझे मित्र साहित्यिक आणि
वन्यजीव अभ्यासक प्रदीप हिरुरकर यांना देतो. त्यांचे आभार मानतो. पृथ्वीवरील पक्षीकुळात
नर पक्ष्यांनाच एवढे सौंदर्य का? याचे कारण अशा सौंदर्यामुळे माद्या त्या नरावर
भाळतात. आपली पिल्लंही अशीच सुंदर व्हावी म्हणून त्यांच्याशी समागम करून आपलं कूळ
वाढविण्यासाठी प्रयत्नरत असतात.
शेंडीवाला रेडवा ➧छायाचित्र: छत्रपती धुमटकर |
शेंडीवाला रेडवा (Crested Bunting) हा देशी स्थानिक स्थलांतरित पक्षी आहे. नर आकाराने चिमणीपेक्षा किंचित मोठा असून रंगाने भारद्वाज पक्ष्यासारखा असतो. डोक्यावर काळ्या-तांबूस रंगाचा तुरा त्याच्या सुंदरतेत अधिक भर घालतो. त्याची शेपटी व पंख लाल भुऱ्या रंगाचे असतात. मादी गर्द भुऱ्या वर्णाची असते. भारतात काश्मीर, पूर्व आसाम, माऊंट अबू, राजस्थान, मध्य भारतात, दक्षिण महाराष्ट्रात (सातारा), बिहार येथे त्यांच वितरण असून ऋतूमानाप्रमाणे स्थानिक स्थलांतर करणारे आहेत. एप्रिल ते ऑगस्ट हा या पक्ष्यांचा विणीचा हंगाम असून पाषाणयुक्त माळराने, वनातील शेतीचा प्रदेश ही त्यांची निवासस्थाने आहेत.
डोंगराच्या पायथ्याशी गवती
झुडपांमध्ये नर-मादी गवताच्या पात्याने वाटीच्या आकाराची घरटी बांधतात. मादी
तीन-चार अंडी देते. अंड्यातून पिल्लं बाहेर पडल्यावर नर-मादी
दोघेही पिल्लांना अन्न भरविणे, त्यांचे रक्षण करणे इ. कामे जबाबदारीने करतात.
हिमालयाच्या पायथ्याशी १५०० ते १८०० मीटर उंचावरही हे पक्षी घरटी बांधतात. मादी
पिक् पिक् तर नर विच् विच् विच् व्ही असा आवाज करतो. असा हा डोंगराच्या पायथ्याशी
हिरव्या रानावनात राहणारा इंद्रधनु सौंदर्याचा शेंडीवाला रेडवा पक्षी त्याच्या
कुटुंबासह
निरीक्षण करायला मिळणे हे या हिरव्या हिरव्या श्रावणी अरण्यातील भटकंतीचं यशच
म्हणावे लागेल. श्रावण म्हणजे भक्ती आणि पूजेचा महिना. शहरात, गावात, डोंगरदऱ्यात असलेल्या शंकराच्या पूजेत जनता गुंग झालेली असते. मी मात्र
रानावनातील हिरव्या सौंदर्यात सजीवसृष्टीच्या शोधात भटकत असतो. कारण माझा परमेश्वर
येथील अरण्यरूपी स्वर्गात आहे. तो मला नेहमीच भरभरून देत असतो. ते असतं हिरव्या
रानाचं देणं दुर्मिळ अशा शेंडीवाला रेडवा पक्ष्याच्या शोधाच्या रूपानं.
{कृपया या लेखाचे सर्व हक्क
सुरक्षित आहेत. लेखकाच्या पूर्वपरवानगी शिवाय अंशतः व पूर्णतः प्रकाशनास बंदी.
संदर्भ म्हणून वापरल्यास ब्लॉगचा संपूर्ण उल्लेख लेखकाचा नावासह करावा.}
अतिशय सुंदर 👌👌
उत्तर द्याहटवाWhile going to nature, a person must have the right research. And to express the words together, it is very important to have word wealth. Despite all this, it is very important for the person to have interest in that nature and those birds. Nobody is beautiful and serene by nature. You have captured an interesting narrative of natural beauty by using the right words. very beautiful.
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर माहीती सरजी...
उत्तर द्याहटवाछान लेख आहे. छायाचित्रे अप्रतिम आहेत
उत्तर द्याहटवाVery much informative yet enrertaining article !
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर
उत्तर द्याहटवाप्रत्यक्ष तिथे फिरून आल्याचा अनुभव आला वाचून
लेख वाचनातून प्रत्यक्षात रान वाटेनी जंगल भटकंती सुरू असल्याचा भास होतो.
उत्तर द्याहटवाअप्रतीम छायाचित्रासह लेख छान अतिशय सुंदर .
खुप छान वर्णन
उत्तर द्याहटवा